मुंबई : त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अमानुष घटनेचा व्हॉईस ऑफ मीडिया व V.O.M. इंटरनॅशनल फोरम तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.
पत्रकारांवर होणारे असे वारंवार हल्ले ही लोकशाहीस काळिमा फासणारी व चौथ्या स्तंभावर सरळ आघात करणारी बाब आहे. पत्रकार समाजातील सत्य घटनांचा आवाज बनतात, अन्याय, भ्रष्टाचार व सामाजिक प्रश्न प्रकाशात आणतात. अशा व्यक्तींवर हल्ले होणे असह्य असून लोकशाहीतील गंभीर धोक्याचे लक्षण आहे.
याबाबत व्हॉईस ऑफ मीडिया चे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे म्हणाले, “पत्रकारांवर होणारे हल्ले कधीही सहन केले जाणार नाहीत. दोषींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री व गृह विभागाने याकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा व्हॉईस ऑफ मीडिया राज्यभर उग्र आंदोलन उभारेल.”
तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनीही संताप व्यक्त करत म्हटले की, “संपूर्ण राज्यातील पत्रकार संतप्त आहेत. शासनाने पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरेल. पत्रकारांवरील हल्ले थांबवण्यासाठी विशेष कायदा व ठोस धोरणाची गरज आहे.”
दोन्ही पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तातडीने तीन मागण्या सादर केल्या आहेत –
१) सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी.
२) राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विशेष उपाययोजना कराव्यात.
३) भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी धोरण आखावे.
पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निकाली लागेपर्यंत व्हॉईस ऑफ मीडिया आंदोलनात्मक भूमिका घेईल, असा इशारा संस्थेने दिला आहे.
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी – मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलनाचा इशारा


