सावंतवाडी : आमदार – खासदार यांना टक्केवारी, कमिशनचे व्यवहार करून उदरनिर्वाह करायला ते उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी नाहीत. तुम्ही पहिल्यांदा तुमच्या गावातल्या लोकांना न्याय द्यायला कणकवलीतून संदेश पारकर दोडामार्गात का येतात ? हे जाहीर करा, नंतरच माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करा, असा सल्ला शिवसेना शहरप्रमुख श्री.खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी देत श्री. धुरी यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
श्री.कुडतरकर म्हणाले की, नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या हत्तींना विकण्याचा विषय येत नाही. मात्र, त्यामुळे होणारा स्थानिकांना त्रास लक्षात घेऊन दीपक केसरकर व सरकार प्रयत्न करत आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे लोकांचे जाणारे बळी, दोडामार्गसह अन्य भागातील शेतकऱ्यांचे होणार नुकसान बाबूराव धुरी यांना मान्य आहे का ? ही परिस्थिती अशीच राहिलेली त्यांना हवी का ? वन्य हत्तींपासून गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे. हे नुकसान रोखण्यासाठी योग्य तो मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यामुळेच हत्तींना पकडून त्यांची योग्यरित्या देखबाल व्हावी म्हणून ‘वनतारा’मध्ये पाठविण्याबाबत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बाबूराव धुरी यांनी महायुतीच्या खासदार व आमदार यांच्यावर बोलताना विचार करून बोलावे. अन्यथा, तुम्ही कुणा कुणाच्या ओंजळीने पाणी पीता हे जाहीर करावे लागेल असा इशारा शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर यांनी दिला आहे.


