Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

‘शिक्षक – राष्ट्राचे दिपस्तंभ..!’ – संपादक रूपेश पाटील यांचा शिक्षक दिनानिमित्त विशेष लेख.

शिक्षक – राष्ट्राचे दिपस्तंभ…!

रुपेश पाटील…
(७९७२७७५४५९)

आज शिक्षक दिन. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या विश्वातील तमाम शिक्षक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महानुभव व्यक्तींना मानाचा मुजरा..!

“अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या
ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!”


५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. एका सामान्य शिक्षकाने भारताचे सर्वोच्च राष्ट्रपतीपद भूषविले. हा शिक्षक पदाचा बहुमान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी वाढविला म्हणून भारत सरकारने डॉ.राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा असे ठरविले. डॉ.राधाकृष्णन यांनी शिक्षक या पदाला देशात आणि विदेशात प्रचंड बहुमान मिळवून दिला. पाश्चात्य जगताला भारतीय संस्कृतीचा महत्वपूर्ण परिचय करून देणारा, भारतातील ब्रिटिश सत्ता काळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्वज्ञानाचे महत्त्वाचे भाष्यकार म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे नाव गाजले आहे. त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने ‘राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट’ हा महत्त्वाचा पुरस्कार ठेवला आहे. १९५४ साली भारत सरकारने डॉ.राधाकृष्णन यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च बहुमान प्रदान केला. अशा थोर शिक्षक राष्ट्रपतींचा आज जन्मदिन. शिक्षक हा राष्ट्राचा खऱ्या अर्थाने आधारवड असतो कारण जीवनात आपण कोणतेही पद मिळवले असले तरी त्याची मुहूर्तमेढ ही कोणत्या ना कोणत्या शिक्षकाकडूनच झालेली असते. म्हणूनच थोर संत कबीरदासजी असं म्हणतात-
“गुरु पारस को अंतरो,
जानत है सब संत..!
वह लोहा कंचन करे,
ये करी लय महंत..!”
अशी शिक्षकांची महती कबीरजी व्यक्त करतात. सद्या भारतात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणण्याचे धोरण पंतप्रधान आणि शिक्षण मंत्रालयाने ठरविले आहे. कारण शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे. म्हणून बदलणाऱ्या जगासोबत शिक्षणही बदलावे लागते. हा बदल सुयोग्य ठरविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची ठरते. व्यक्तीच्या जीवनाला विधायक दिशा देण्याचे काम शिक्षण प्रक्रियेतून शिक्षक करीत असतात. म्हणजेच खऱ्या अर्थाने शिक्षक हे राष्ट्राचे निर्माते असतात.


आपल्या भारतीय इतिहासातील गुरु शिष्यांना एक विशेष परंपरा लाभली आहे. अगदी देवादिकांनाही आपल्या आयुष्यात शिक्षकांच्या चरणी लीन व्हावे लागले, आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला दिशा प्राप्त झाली. अशी शिक्षकांची महती साऱ्या जगाला परिचित आहे. आपल्या वैदिक काळात शिक्षकांना गुरुचे मानाचे स्थान मिळाले आहे. ही गुरू-शिष्य संबंधाची पवित्रता समाजाला दिशा देणारी आहे.
डॉ.राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने संपूर्ण देशभर आजच्या दिवशी शिक्षकांना विविध पुरस्कार आणि सन्मान देऊन त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला जातो.
शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून शिक्षकांकडूनच आपल्याला जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टीकोन मिळत असतो. म्हणूनच “गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः ” असे म्हटले जाते.
आई नंतर शिक्षक हे आपले सर्वात जास्त आवडणारे व्यक्तिमत्व असते. कारण शिक्षकालाच ‘मास्तर’ असे पूर्वी म्हटले जायचे. ‘मास्तर’ म्हणजेच जी व्यक्ती मायेच्या स्तरावरून आपले पालन पोषण करते, आपल्याला विधायक असे संस्कार प्रदान करते तेच खरे मास्तर असतात.
शिक्षक हे समाज परिवर्तनाचे महत्त्वाचे घटक आहेत. भविष्यातील कलावंत, लेखक, विचारवंत, पुढारी, डॉक्टर, इंजिनीयर, शास्त्रज्ञ, प्राध्यापक असे अनेक महत्त्वाची पदे निर्माण करणारा सामर्थ्यशाली व्यक्ती म्हणजे एक शिक्षक असतो. म्हणूनच – “गुरु का महत्व कभी होगा ना कम,
भले करले कितनी भी प्रगती हम,
आज तो है इंटरनेट पे हर प्रकार का ज्ञान,
लेकिन एक शिक्षक ही करते है अच्छे ज्ञान की पहचान…!”
असे म्हटले जाते.
आपल्या जीवनात शिक्षकांची प्रचंड गरज आहे. शिक्षकांची आजच्या काळातील गरज ओळखूनच बदलणाऱ्या शिक्षण पद्धती नुसार आज तंत्रज्ञानाने ओतप्रोत भरलेला ‘टेक्नोसॅव्ही’ शिक्षक समाज घडविण्यासाठी तत्पर आहे. शासनाने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षकांसाठी विविध पुरस्कारांची महत्वपूर्ण तरतूद केली आहे. जेणेकरून शिक्षकांचा बहुमान वाढून शिक्षकांच्या कार्यक्षमता, कार्यतत्परता, कार्यप्रवणता, कार्यकुशलता वाढावी आणि बदलत्या काळानुसार शिक्षक हे राष्ट्राचे निर्माते व्हावेत.
आज व्यक्ती कितीही मोठा झाला तरी जीवनात ज्या शिक्षकांनी त्याला घडविले त्या शिक्षकाला तो कधीच विसरू शकत नाही. अशी अलौकिक जादू शिक्षक या व्यक्तीमत्वात दडलेली आहे. अर्जुनाला घडविणारे द्रोणाचार्य, कृष्णाला घडविणारे सांदिपनी, भगवंत श्रीरामांना घडविणारे वसिष्ठ हे खरोखरच किती महान ‘शिक्षक’ असतील. अशा शिक्षकांच्या थोर परंपरेला आजच्या दिवशी नमन केले जाते. मागील वर्षी डॉक्टर डिसले गुरुजींच्या रूपाने महाराष्ट्राच्या एका सामान्य शिक्षकाने आपल्या कार्यकुशलतेने आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळवून शिक्षक पेशाचा बहुमान वाढविला. जागतिक स्तरावर डिसले गुरुजींच्या रुपाने शिक्षकांचा सन्मान झाला. म्हणूनच शिक्षकांची महती कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील..!अशी शिक्षकांची महान परंपरा निभावणाऱ्या विश्वातील साऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा…!
“गुरुदेव के श्री चरणो मे,
श्रद्धा सुमन संग वंदन,
जिनकी कृपा निरसे
जीवन हुआ चंदन,
धरती कहे,अंबर कहे,
कहते है एक ही तराना,
गुरु आप ही वह पावन नूर है,
जीन से हुआ रोशन जमाना…!”

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles