मालवण : त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या भव्य पटांगणावर मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा दिमाखात संपन्न झाल्या. क्रीडांगण विकास योजनेतून क्रीडा विभागाच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे भव्य मैदान तयार करण्यात आले आहे. सदर मैदान मैदानी स्पर्धेसाठी तालुक्यात उपयुक्त असे मैदान आहे. त्यामुळे सातत्याने तीन वर्षे या ठिकाणी मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा क्रीडा समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात येतात. या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबईचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी विशेष मेहनत घेतात आणि त्यातून स्पर्धा नियोजन दर्जेदार होते.
स्पर्धेचे उद्घाटन शालेय समिती अध्यक्ष श्री. सहदेव चव्हाण यांच्या हस्ते, शालेय समिती सदस्य श्री दशरथ घाडीगांवकर, मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. वामन तर्फे, मालवण तालुका क्रीडा समिती सचिव तथा जिल्हा अध्यापक संघ अध्यक्ष श्री. अजय शिंदे, जिल्हा कास्ट्राईब संघटना अध्यक्ष श्री. संजय पेंडुरकर, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य,क्रिडा विभाग प्रमुख श्री.सुभाष सावंत यांच्या शाळांचे प्रशिक्षक, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सर्व स्पर्धक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी संस्था आणि प्रशालेच्या वतीने आणि मालवण तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या वतीने क्रीडा समन्वय समिती सचिव श्री. अजय शिंदे सर यांचा क्रीडा समन्वय समिती सचिव म्हणून केलेल्या कार्याबद्दल आणि सेवा निवृत्ती निमित्त ह्दय सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पत्नी व उपस्थित महिला प्रशिक्षकांचा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत पहिल्या दिवशी एकूण 27 शाळांमधील 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशी 28 शाळांमधील 300 स्पर्धकांनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवसाच्या स्पर्धेचे उद्घाटन संस्था संस्थापक सदस्य तथा शालेय समिती सदस्य श्री. चंद्रकांत गावकर, असरोंडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. विजय सावंत, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ हिवाळेचे अध्यक्ष श्री. महेश गावडे, शालेय समिती सदस्य श्री. दशरथ घाडीगांवकर, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुशांत पाटील, हिवाळे हायस्कूल मुख्याध्यापक श्री. पवार सर, कन्याशाळा मुख्याध्यापक श्री. शिंदे सर, शिक्षकेतर कर्मचारी संघटना कार्याध्यक्ष श्री. प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. स्पर्धा यशस्वी पार पाडल्याबद्दल मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनी क्रीडा समन्वय श्री. अजय शिंदे, क्रीडा शिक्षक, पंच, विद्यार्थी, शिरवंडे हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी व संस्था पदाधिकारी, शालेय समिती, शिक्षक पालक संघ सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, देणगीदार यांना धन्यवाद दिले.


