दुबई : आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यापूर्वीचा सर्वात रोमांचक सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या संपूर्ण हंगामात इतका चुरशीचा सामना झालाच नव्हता. या सामन्यात भारतीय खेळाडूंसह चाहत्यांनीही डोक्याला हात लावला. कारण, आयसीसीच्या एका नियमाने श्रीलंकेचा फलंदाज दासुन शनाका वाचला होता. हा नियम स्वतः भारतीय खेळाडूंनाही माहिती नव्हता. त्यामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत सगळ्या खेळाडूंनी अंपायरला घेराव घातल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
भारत-श्रीलंकेच्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा –
सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना, अर्शदीप सिंगच्या चौथ्या चेंडूवर शनाका चुकला आणि त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. मागून संजू सॅमसनने थेट थ्रो मारून कामिंदु मेंडिसला आऊट केले. लेग अंपायरने लगेच त्याला आऊटही दिले. त्या क्षणी असे वाटले की, श्रीलंकेचा डाव संपला आहे आणि आता खेळाडू मैदानाबाहेर जातील. मात्र, याचवेळी मोठा ट्विस्ट आला. कारण अर्शदीपने याआधी शनाकाच्या कॅचसाठी अपील केली होती आणि अंपायरनेही बोट वर करून त्याला आऊट दिले होते. पण थर्ड अंपायरने रीप्ले पाहिल्यावर चेंडूला बॅटचा स्पर्शच झालेला नव्हता, त्यामुळे शनाका नॉट आऊट ठरला. आता खरी कोंडी झाली ती इथेच. शनाका नॉट आऊट ठरला, पण सॅमसनने स्ट्रायकर एंडवर मेंडिसला रनआऊट केले होते. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. पण नियमानुसार शनाका नॉट आऊट असल्याचं पंचांनी स्पष्ट केलं.
आयसीसीच्या नियमांनुसार काय घडतं?
इथेच क्रिकेटचा एक महत्त्वाचा नियम लागू झाला. नियमानुसार, जेव्हा मैदानी अंपायर एखाद्या फलंदाजाला आऊट ठरवतो, तेव्हाच चेंडू ‘डेड’ मानला जातो. हा निर्णय नंतर बदलला गेला तरी फरक पडत नाही. नियम 20.1.1.3 नुसार, ज्या घटनेमुळे फलंदाज आऊट ठरतो, त्या क्षणापासून चेंडू डेड मानला जातो. याशिवाय अजून एक नियमही हे स्पष्ट करतो. नियम 3.7.1 मध्ये म्हटले आहे की, “प्लेअर रिव्ह्यू नंतर जर मूळ आऊटचा निर्णय बदलून नॉट आऊट केला गेला, तर आधीच निर्णय दिला गेला त्या क्षणापासूनच चेंडू डेड मानला जाईल.”
सुपर ओव्हरच्या एक-एक चेंडूचा थरार –
श्रीलंकेच्या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला.
- पहिला चेंडू – पहिल्याच चेंडूवर कुसल परेरा आऊट झाला. रिंकू सिंगने त्याचा कॅच घेतला.
- दुसरा चेंडू – कामिंदू मेंडिसने 1 धाव घेतली.
- तिसरा चेंडू – डॉट बॉल
- चौथा चेंडू – वाईड
- चौथा चेंडू – अर्शदीप सिंगने आधी कॅचसाठी अपील केले होते, त्यामुळे दासुन शनाका आऊट देण्यात आले नाही.
- पाचवा चेंडू – दासुन शनाका आऊट
टीम इंडियाच्या सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 2 धावा केल्या आणि भारतासमोर 3 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर तीन धावा काढून भारताला रोमांचक विजय मिळवून दिला.


