सावंतवाडी : राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र (NCCR), पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय किनारे स्वच्छता दिनाचे औचित्य साधून श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी (स्वायत्त) यांच्या वतीने सोमवार, दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता मालवण दांडी समुद्रकिनारी ‘किनारे स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.
या अभियानाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते होणार आहे.
या उपक्रमात महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसी विभागाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक, तसेच मालवण नगरपरिषद, युथ बीटस फॉर क्लायमेट (मालवण), मेरीटाईम बोर्ड (मालवण), इकोमेट (मालवण), कांदळवन विभाग (मालवण), पर्यटन व्यवसायिक महासंघ सिंधुदुर्ग आणि नीलकांती कृषी व मत्स्य पर्यटन (मालवण) यांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
अभियानादरम्यान दांडी समुद्रकिनाऱ्यावरील कचरा संकलित करून त्याची वर्गवारी करण्यात येईल व तो कचरा मालवण नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाकडे सुपूर्द केला जाणार आहे.
या उपक्रमात सहभागी होऊन समुद्रकिनारा स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यास हातभार लावावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एल. भारमल यांनी केले आहे.


