- अक्षय धुरी.
सावंतवाडी : झी स्टुडिओज प्रस्तुत आणि सुबोध खानोलकर लिखित-दिग्दर्शित ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे शिखर गाठले आहे. पहिल्याच आठवड्यात तब्बल १०.८० कोटी रुपयांचा गल्ला जमवत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करूनही चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांची गर्दी कायम असून, केवळ सिंधुदुर्ग किंवा कोकणातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातील मराठी प्रेक्षकांकडून या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोकणातील एका छोट्याशा गावात चित्रित झालेल्या या चित्रपटाची कथा, मार्मिक संवाद आणि कलाकारांचा अभिनय हे यशाचे मुख्य गमक ठरले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध केले आहे. मात्र, या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे कोकणातील स्थानिक कलाकारांना मिळालेली संधी आणि त्यांनी केलेले उत्कृष्ट काम. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे चित्रपटात एक अस्सलपणा उतरला आहे, ज्याची दखल सर्वत्र घेतली जात आहे.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या कोकणच्या मातीतील ही कथा, दशावताराच्या समृद्ध परंपरेला आधुनिक कथानकाशी जोडून एक वेगळाच अनुभव देते. चित्रपटाची मांडणी वरवर साधी वाटत असली तरी, ती सामाजिक आणि भावनिक मुद्द्यांवर अचूक भाष्य करते. या अभूतपूर्व यशामुळे ‘दशावतार’ हा केवळ एक चित्रपट न राहता, मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे.


