सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्या वतीने सावंतवाडी तालुका मर्यादित विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘स्वरचित काव्य वाचन स्पर्धेत जि. प. शाळा कास नं. १ ची विद्यार्थिनी गौरी राजन गावडे प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली, द्वितीय तनिष्का आनंद राणे, नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली तर मिलाग्रीस हायस्कुलच्या इंग्रजी माध्यमाची सिया सचिन चव्हाण हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच शमिका सदू गवंडे, जि.प. शाळा कास नं.१ आणि माधुरी महेश राऊळ कलंबिस्त इंग्लिश स्कूल यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. सर्व विजेते स्पर्धक आणि सहभागींना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी तहसीलदार श्री. पाटील यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वाचन करणं आवश्यक आहे. यातून नवीन गोष्टी आपण शिकू शकतो. जिंकण किंवा हरण महत्त्वाच नसून तुम्ही स्पर्धेत सहभाग घेता की नाही, हे फार महत्त्वाचे आहे. जिद्दीने स्पर्धांत सहभागी होत तुमच्या आवडीच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करा, असे आवाहन त्यांनी केले.
कोमसाप सावंतवाडी शाखा आयोजित व देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजमध्ये पार पडलेल्या सदर स्वरचित काव्यस्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ कादंबरीकार वृंदा कांबळी, कोमसापचे ज्येष्ठ सदस्य प्रा.सुभाष गोवेकर, देशभक्त शंकरराव गवाणकर कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.
कोकणातील साहित्याचा वारसा कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि मुलांमध्ये लेखन-वाचनाची आवड वाढवण्यासाठी कोमसाप सावंतवाडी शाखेकडून या स्पर्धेचं केलेलं आयोजन स्तुत्य स्वरुपाचे आहे, असे मत ज्येष्ठ कादंबरीकार साहित्यिका वृंदा कांबळी यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त व्यक्त केले. हा कार्यक्रम कोकणच्या नव्या पिढीतील साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा आणि साहित्यिक वातावरणाची निर्मिती करणारा ठरेल असा विश्वास प्रा. सुभाष गोवेकर यांनी व्यक्त केला. प्राचार्य यशोधन गवस यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कोमसापचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत, जिल्हा सदस्य भरत गावडे, तालुका उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सदस्य ॲड.नकुल पार्सेकर, प्रा. रूपेश पाटील, सहसचिव विनायक गांवस, मंगल नाईक-जोशी, किशोर वालावलकर, प्रज्ञा मातोंडकर आदी उपस्थित होते.
कोकण मराठी साहित्य परिषदेची नूतन तालुका कार्यकारिणी निवड झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम होता.



कोमसापच्या ध्येयानुसार युवा साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, युवा साहित्यिकांना साहित्याच्या प्रवाहात आणण्यासाठी आजची काव्यस्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेस तालुक्यातून कास, इन्सुली, कलंबिस्त, नेमळे, तळवडे, मळगाव सह सावंतवाडी शहरातील कळसुलकर, मिलाग्रीस हायस्कुलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यावेळी ॲड. नकुल पार्सेकर, कवी दीपक पटेकर, मंगल नाईक-जोशी यांनी विद्यार्थ्यांना काव्यलेखन, साहित्य विषयक मार्गदर्शन केले. यावेळी आत्माराम धुरी, साबाजी परब आदींसह स्पर्धक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर यांनी केले. तर स्पर्धेचे परीक्षण मंगल नाईक जोशी व दीपक पटेकर यांनी केले. सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी तर आभार प्रा. रुपेश पाटील यांनी मानले.


