मुंबई : M3M हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 ची 14 वी आवृत्ती अलिकडेच रिलीज झाली. यंदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीत मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब सर्वात पुढे आहे. त्यांच्याकडे एकूण 9.55 लाख कोटीची संपत्ती आहे. तर गौतम अदानी यांचे कुटुंब देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अदानी यांची संपत्ती 8.15 लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. मात्र खास बाब म्हणजे यंदा रोशनी नाडर यांचे नाव पहिल्यादा टॉप तीनमध्ये आले आहे. रोशनी नाडर मल्होत्रा आणि त्यांचे कुटुंब यांची संपत्ती 2.84 लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीत झळकले आहे. रोशनी नाडर आपल्या कुटुंबाची परंपरा पुढे चालवत आहेत.
रोशनी HCL टेक्नोलॉजीजच्या चेअरपर्सन –
रोशनी नाडर या हिंदूस्थान कॉप्युटर्स लिमिटेड म्हणजेच HCL टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष आहेत. रोशनी यांच्या संपत्तीत वाढ त्यांचे वडील आणि HCL ग्रुपचे फाऊंडर शिव नाडर यांच्याद्वारे 47% ची हिस्सेदारी ट्रान्सफर केल्यानंतर झाली आहे. शिव नाडर यांनी HCL टेक्नोलॉजीजच्या प्रमोटर संस्थांमध्ये वामा सुंदरी इन्वेस्टमेंट्स (वामा दिल्ली) आणि HCL कॉर्पमध्ये 47% वाटा आपल्या मुलीला ट्रान्सफर केला होता. सध्या भारतात रोशनी नाडर यांच्यापेक्षा श्रीमंत केवळ मुकेश अंबानी आणि गौतम अदानी उरले आहेत.
शिव नाडर फाऊंडेशन आणि दि हॅबिटेट्स ट्रस्टचे काम –
रोशनी नाडर या त्यांचे वडील शिव नाडर फाऊंडेशनच्या (1994 मध्ये स्थापित ) ट्रस्टी आहेत. हे फाऊंडेशन गरीब आणि वंचित मुलांना शिक्षण देण्याचे काम करते. यासोबतच रोशनी यांनी 2018 मध्ये ‘दि हॅबिटेट्स ट्रस्ट’ची स्थापना केली होती. ही संस्था भारतात पर्यावरण आणि वन्य जीवन संरक्षण क्षेत्रात काम करते. ही संस्था वन्यजीव संवर्धन, पर्यावरणीय संतुलन आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण यावर काम करते
महिलांचा वाढता प्रभाव –
2025 च्या रिच लिस्टमध्ये एकूण 101 महिलांचा समावेश आहे. यावरुन दिसते की महिला देखील आता व्यवसाय आणि संपत्ती निर्माण क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आहेत. एकूण श्रीमंतात 66% स्व-निर्मित आणि 74% नवीन अब्जाधीशांनी आपली सुरुवात तळागाळातून शून्यातून सुरुवात केली आहे.म्हणजे बहुतांश लोक स्वत:च्या मेहनतीनेच वर आले आहेत.
भारतात वाढतेय अब्जाधीशांची संख्या –
आज देशात 350 हून अधिक अब्जाधीश रहातात. ही संख्या तेरा वर्षांपेक्षा सहा पट जास्त आहे. या सर्व अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीची बेरीज केली तर ती 167 लाख कोटींहून अधिक रुपये होतात.ही संख्या भारताच्या एकूण जीडीपी पेक्षाही जवळपास अर्धी आहे.
तरुण अब्जाधीशांचाही समावेश –
यंदा यादीत तरुणांचाही भरणाही जास्त आहे. पेरप्लेक्सिटी कंपनीचे 31 वर्षीय अरविंद श्रीनिवास हे 21,190 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत. याशिवाय बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान देखील पहिल्यांदा अब्जाधीशांच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे.शाहरुखची संपत्ती 12,490 असल्याचे म्हटले जात आहे.


