सावंतवाडी : एका पणतीची प्रखर राष्ट्रवादाची धगधगती मशाल होताना पाहणे अभिमानाचे आणि आनंदाचे आहे. शताब्दीकडे पोहोचलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीत आपल्या जीवनाला तनमनधनपूर्वक राष्ट्रसमर्पित केलेल्या हजारो ज्ञातअज्ञात स्वयंसेवकांचा असीम त्याग आहे.

अनेकांच्या रुधीरबलिदानातून हिंदुत्वाचे प्रतीक असलेला हा केशरी ध्वज अधिकाधिक तेजोयुक्त होत विश्वावर फडकत आहे. या पवित्र गंगेला धरतीवर आणण्यासाठी भगीरथासम अहर्निश ध्येयसाधना करणाऱ्या संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि सर्व ज्येष्ठ स्वयंसेवकांचे या शुभप्रसंगी स्मरण करून सर्वांच्या स्मृतीला प्रणाम करतो. या जाज्वल्य राष्ट्रविचाराच्या प्रवाहात शताब्दी वर्षाच्या सोहळ्यानिमित्त सहभागी होण्याची संधी ही माझ्यासाठी निश्चितपणे मागील अनेक जन्माची पुण्याई असली पाहिजे. आजचा दिवस केवळ विजयादशमीचाच नव्हे तर विजयशताब्दीचा आहे. ही राष्ट्रआराधना अखंड चालत राहो हिच भारतमातेच्या चरणी प्रार्थना!, अशी प्रांजळ भावना भाजपा युवा नेते विशाल परब यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल व्यक्त केली आहे.


