मुंबई : गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केला जातात. मात्र ही योजना सुरू करत असताना सरकारने काही अटी घातल्या होत्या , ज्यामध्ये ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, ज्या महिलांचं वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असेल त्याच महिला या योजनेसाठी पात्र असतील अशा काही अटी होत्या, मात्र अनेक ठिकाणी पात्र नसलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं.
दरम्यान त्यानंतर सरकारने पुन्हा एकदा या योजनेचा आता आढावा घेण्यास सुरुवात केली आहे, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, अशा महिलांची नावं या योजनेतून कमी केली जात आहेत. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार आता ही योजना बंद होणार असल्यचां बोललं जात आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, खरचं ही योजना बंद होणार का? अशी भीती देखील अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नेमका हाच संभ्रम दूर करण्याचं काम आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात केलं आहे, लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, सुरूच राहणार असल्याचं त्यांनी आजच्या दसरा मेळाव्यात म्हटलं आहे.
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी एका खुर्चीसाठी सर्व काही गमावलं. आपल्याच पक्षातील नेत्यांना संपवणारे हे तर ‘कटप्रमुख’ आहेत, हे पक्षप्रमुख नाही तर कारस्थान करणारे कटप्रमुख आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर नंबरवरून टीका केली, ते वरून खाली आले. तुम्ही घरात बसून वर गेला. किती टीका करता. तुमच्या सारखा रंग बदलणारा मी कधीच पाहिला नाही, असा हल्लाबोल यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.


