मुंबई : बीसीसीआय निवड समितीने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 4 ऑक्टोबरला भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात 5 टी 20 सामन्यांचा थरार रंगणार आहे. सूर्यकुमार यादव टी 20i मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याला एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रोहितकडून कॅप्टन्सी काढून शुबमनला नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. शुबमन 19 ऑक्टोबरपासून नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याआधी आता मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियाची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या दोघांनी टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे.
हिटमॅन-रनमशीन निवृत्त होणार?
आगामी वनडे वर्ल्ड कप 2027 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रोहितच्या जागी शुबमनला कॅप्टन्सी देण्यात आल्याचं निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केल्यानंतर म्हटलं.
आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला आता 2 वर्ष बाकी आहेत. सध्या रोहित 38 वर्षांचा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत रोहित 40 वर्षांचा होईल. तसेच 2 वर्षांत एकदिवसीय सामने कसोटी आणि टी 20i च्या तुलनेत कमी आहेत. तसेच रोहित-विराट टी 20-कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या दोघांना तोवर फार सामने खेळायची संधी मिळणार नाही. तसेच 40 व्या वर्षापर्यंत दोघांचा फिटनेस राहिल का? हा प्रश्नही आहे.
रोहित आणि विराटला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत संधी मिळणार की नाही? हे तेव्हाच समजेल. मात्र तोवर दोघांसमोर स्वत:ला फिट ठेवण्याचं आव्हान असणार आहे.
‘रोको’ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निरोप –
रोहित आणि विराट या दोघांनीही आपल्या एकदिवसीय निवृत्तीबाबत भाष्य केलेलं नाही. तसेच दोघांनी 2027 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याबाबतही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र विराट आणि रोहितची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे रोहित आणि विराटची ऑस्ट्रेलिया विरुद्धची कारकीर्दीतील शेवटची एकदिवसीय मालिका असू शकते. त्यामुळे दोघेही अखेरीस खेळताना दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलिया बोर्ड निरोप देणार!
दरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून रोहित आणि विराटला निरोप देण्यात येण्याची शक्यता आहे. “विराट-रोहितची आमच्या देशात खेळण्याची ही शेवटची वेळ असू शकते. त्यामुळे आम्ही विराट आणि रोहितला त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील योगदानासाठी निरोप समारंभाद्वारे गौरवू इच्छितो”, असं ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचे टॉड ग्रीनबर्ग यांनी म्हटलं.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
दरम्यान उभयसंघात 19 ते 25 ऑक्टोबर दरम्यान एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. दुसरा सामना हा 23 ऑक्टोबरला एडलेडमध्ये होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 25 ऑक्टोबरला सिडनीत खळवण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि-विराट 25 तारखेला निवृत्ती जाहीर करणार असल्याचा दावा केला जात आहे. आता 25 ऑक्टोबरलाच खरं काय ते समजेल.


