सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यापूर्वीच सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले होते. यानंतर २० नगरसेवकांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यात ‘कही खुशी, कही गम’ अशी परिस्थिती पहायला मिळाली. काही इच्छुकांचे पत्ते आरक्षणात कापले गेलेत.
प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली प्र. मुख्याधिकारी विनायक औंदकर यांनी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडली. यावेळी प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे यांसह न.प.चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जान्हवी कमळकर, राक्षी वेल्हाळ, उत्कर्ष दळवी, चैतन्य राऊळ या राणी पार्वती देवी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या. यात १० प्रभागातून २० जागांसाठी ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग १० हा अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित राहिला. तसेच नागरीकांचा मागास प्रवर्गातून प्रभाक क्रमांक १, प्रभाग २ व प्रभाग ९ मधून महिलांना संधी मिळाली आहे. तसेच प्रभाग ८ व ४ या ठिकाणी ना.म.प्र.खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले आहे.
प्रभागनिहाय आरक्षण बघता प्रभाग 1 – अ. (ना.म.प्र.महिला) ब. (खुला), प्रभाग 2- अ. (ना.म.प्र. महिला) ब. (खुला), प्रभाग 3- अ. (सर्वसाधारण महिला) ब. (खुला), प्रभाग 4 – अ. (सर्वसाधारण महिला) ब.( ना.म.प्र खुला), प्रभाग 5 – अ. (सर्व. महिला) ब. (खुला), प्रभाग 6- अ. (सर्वसाधारण महिला )ब. (खुला), प्रभाग 7 – अ. (सर्वसाधारण महिला )ब.( खुला), प्रभाग 8- अ. (सर्वसाधारण महिला) ब. (ना.म. प्र. खुला ), प्रभाग 9 – (अ. ना.म. प्र. महिला) ब. (सर्वसाधारण खुला) तसेच प्रभाग 10 – अ. (सर्वसाधारण महिला) ब. (अनुसूचित जाती ) यासाठी आरक्षित राहिला आहे. यामध्ये गेली अनेक वर्षे नगरसेवक राहिलेले राजू बेग यांचा आरक्षणात पत्ता कट झाला आहे. मात्र, प्रभाग वाढल्याने त्यांना इतर ठिकाणी संधी आहे. तसेच विद्यमान नगरसेविका दिपाली सावंत, भारती मोरे यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. मात्र, त्यांनाही प्रभाग रचना बदलल्याने पुन्हा संधी देखील आहे. प्रभाग वाढल्याने इच्छुक असलेल्या काहींचे पत्ते यात कापले गेलेत. त्यामुळे ‘कही खूषी, कही गम’ अशी परिस्थिती पहायला मिळाली. या आरक्षणामुळे काही दिग्गजांना आपले प्रभाग बदलावे लागणार आहेत. तर काही ठिकाणी नवीन इच्छुकांना संधी मिळणार आहे. राजकीय पक्षांना सक्षम महिला उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे.
प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर होताच सावंतवाडीतील राजकीय गोटात त्वरित हालचाली सुरु झाल्या आहेत. आरक्षणाची यादी नगरपरिषदेच्या सूचना फलकावर लावण्यात आली असून इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी सोडतीच्या तपशिलांचे बारकाईने विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. ज्या प्रभागांमध्ये आरक्षण बदलले आहे तेथील इच्छुकांनी पर्यायी प्रभागांची चाचपणी सुरु केली आहे. आजच्या आरक्षण सोडत प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, राजू बेग, अनारोजीन लोबो, आनंद नेवगी, मनोज नाईक, ॲड. परिमल नाईक, सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, समीर वंजारी, अजय गोंदावळे, महेंद्र सांगेलकर ,ॲड. संजू शिरोडकर, ॲड. राघवेंद्र नार्वेकर, ॲड. अनिल केसरकर, ॲड. राजू कासकर, प्रसाद अरविंदेकर, अर्चित पोकळे, निशांत तोरसकर, विनोद सावंत आदींसह शहरातील नागरिक उपस्थित होते.


