सावंतवाडी : सन १९१३ पासून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील असुविधाबाबत माझ्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला.अनेकदा उपोषण केली.त्याच काळात स्व.गोपाळराव दुखंडे (एक दुर्मिळ समाजवादी परिवारातील प्रामाणिक रोखठोक नेते) त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अभिनव फाउंडेशनच्या वतीने श्री ओंकार तुळसुलकर, प्रा.सुभाष गोवेकर अशा काही मंडळीनी आर्थिक भार सोसून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अनेकदा जशी खुनाला वाचा फुटते,तशी कोल्हापूर खंडपीठाचे गठन झाल्यावर तब्बल बारा वर्षांनी या याचिकेला वाचा फुटली. मा.उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर गेली कित्येक वर्ष जो शासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे बोजवारा उडालेला आहे त्याचे वास्तव आणि गांभीर्य ओळखून मा.उच्च न्यायालयाने याची तातडीने दखल घेऊन संबंधिताना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.ते त्यानी खंडपीठा समोर सादर केले. याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आले की अनेक बाबतीत अतिशय धादांत खोटे प्रतिज्ञापत्र सादर केलेले असून वास्तव वेगळेच आहे.मात्र मा.खंडपीठाने एक अतिशय चांगला निर्णय घेतला व या उपजिल्हा रुग्णालयातील वास्तव् शोधण्यासाठी “सत्य शोधन समिती” नियुक्त केली.आमच्या सुदैवाने या समितीत सिंधुदुर्गचे सुपूञ आणि आमचे परममित्र ॲड.संग्राम देसाई आहेत.हे समजल्यावर मी एक सजग नागरिक म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या आरोग्य विषयक असुविधाबाबत सविस्तर माहिती त्यांना दिली, असे मत अॅड. नकुल पार्सेकर यांनी व्यक्त केले.

अॅड. नकुल पार्सेकर पुढे म्हणाले – ब्लड बॅक,ट्रामा केअर ,अतिदक्षता विभाग आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अपुरा कर्मचारी वर्ग. जेथे कमीच कमी सोळा डॉक्टर पाहिजेत त्या ठिकाणी फक्त पाच डॉक्टर काम करत असून काही कंञाटी डॉक्टर नियुक्त केलेले आहेत.ज्याना त्यांच्या कामाचा मोबदला पाच पाच महिने मिळत नाही.सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे संपूर्ण जिल्ह्य़ात फक्त एकच फिजीशियन आहे.ते एकटे बिचारे काय करणार ? या उपजिल्हा रुग्णालयात जे पाच डॉक्टर कार्यरत आहेत ते लोड घेऊन, ञास सहन करून जेवढी शक्य असेल तेवढी सेवा देत आहेत. वारंवार शासनाकडे मागणी करण्याशिवाय ते काहिच करू शकत नाहीत.
ज्या याचिकेची सुनावणी सुरू आहे त्या अनुषंगाने आज सावंतवाडीतील काही सजग नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ऐवले सर व इतरांशी संवाद साधला.सर्व विभागांची प्रत्यक्ष पहाणी केली.प्रतिज्ञापत्रातील दिलेली खोटी माहिती व वास्तव याची शहानिशा केली.या सर्वच सजग नागरिकांनी केलेली पहाणी व वास्तव याचा अहवाल, Fact finding committee निश्चितच करेल.यावेळी ऐवले सर व त्यांच्या इतर स्टाफने चांगले सहकार्य केले.
खरं तर सतत सुमारे सतरा वर्ष या सावंतवाडी विधानसभेचे आमदार व साडेआठ वर्ष मंञी राहिलेल्या मा.दिपक भाईकडून आमच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या.एवढी सत्तेची ताकद असताना या उपजिल्हा रुग्णालया साठी एक फिजीशिएन आणता आला नाही.


