विशाखापट्टणम : आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने यजमान टीम इंडियाचा विजयरथ रोखत या मोहिमेतील दुसरा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 252 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 7 बॉलआधी आणि 3 विकेट्स राखून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 48.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्सच्या मोबदल्यात 252 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह सलग दुसरा विजय मिळवला. तसेच दक्षिण आफ्रिकेने यासह भारताला सलग तिसरा विजय मिळवण्यापासून रोखलं.
दक्षिण आफ्रिकेची विजयी हॅटट्रिक –
भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतराने झटके दिले होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिका सामन्यात एक वेळ पराभवाच्या छायेत होती. मात्र त्यानंतरही दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाकडून विजय हिसकावला. दक्षिण आफ्रिकेची 5 आऊट 81 अशी स्थिती झाली होती. मात्र नडीन डीक्लर्क हीने 54 बॉलमध्ये नॉट 84 रन्सची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेने यासह टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध सलग तिसरा विजय साकारला.
डीक्लर्कने हिसकावला विजयाचा घास –
दक्षिण आफ्रिकेला सहावा झटका दिल्यानंतर टीम इंडिया सामन्यावर घट्ट पकड मिळवेल, असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी तसं होऊ दिलं नाही. नडीन डीक्लर्क हीने मैदानात येताच फटकेबाजी सुरु केली. नडीनने ट्रायॉनसह 69 धावा जोडल्या. नडीनने 47 व्या ओव्हरमध्ये क्रांतीच्या बॉलिंगवर सलग 2 सिक्स लगावले. नडीनने यासह 41 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि सामन्यावर पकड मिळवली.
डीक्लर्क त्यानंतर भारतीय गोलंदाजांवर तुटून पडली. डीक्लर्कने 49 व्या ओव्हरमध्ये सलग 2 सिक्स लगावले आणि दक्षिण आफ्रिकेला विजयी केलं. डीक्लर्कने 54 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 8 फोरसह नॉट आऊट 84 रन्स केल्या.


