सावंतवाडी : शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशीलतेचा अनोखा नमुना ठरलेली जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर आज संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय ठरली आहे.
जगातील सर्वोत्तम शाळेचा मान मिळवणारे दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या या शाळेला सिंधुदुर्गातील राज्य आदर्श शिक्षक प्राप्त उपक्रमशील शिक्षक प्रकाश कानूरकर यांनी नुकतीच भेट दिली.
या विशेष प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आयुक्त सचिनंद्रप्रताप सिंह, SCERT संचालक राहुल रेखावर, शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील, पुणे विभागीय उपसंचालक डॉ. गणपत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन वर्षांत घडवलेले चमत्कारिक परिवर्तन –
केवळ दोन वर्षांच्या कालावधीत वारे गुरुजींनी उभारलेले हे शिक्षणमंदिर आज जागतिक स्तरावर पोहोचले आहे.
विद्यार्थी संख्या – ३ वरून थेट १२० पर्यंत झेप.
नवीन प्रयोग : “Subject Friend” पद्धत, बहुभाषिक शिक्षण (इंग्रजी, फ्रेंच, जपानी), कोडिंग, अॅनिमेशन, डिझाईन आदी कौशल्याधारित शिक्षण.
लोकसहभाग: गावकऱ्यांच्या श्रमदान व सहकार्याने उभारलेली आधुनिक शाळा.
सन्मान : National Teachers Award व प्रतिष्ठित World’s Best School Prize 2025 (₹ १ कोटी रुपयांचा पुरस्कार)
पूर्वी “Zero Energy School” म्हणून ओळखली जाणारी वाबळेवाडी शाळा हेच वारे गुरुजींच्या शिक्षणक्रांतीचे पहिले पाऊल ठरले होते. आता जालिंदरनगर शाळेने जागतिक नकाशावर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.

शिक्षण मंत्र्यांचे प्रेरणादायी विचार –
या प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री मा. दादाजी भुसे साहेब यांनी शिक्षणाच्या नव्या दिशेचा संदेश दिला.
“शिक्षण हे केवळ रोजगारासाठी नव्हे, तर राष्ट्रप्रेम, जीवनमूल्ये आणि समाजनिर्मितीची प्रेरणा देणारे असावे.”
त्यांनी मुलींसाठी काही महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या —
1. स्वसंरक्षण प्रशिक्षण (Self-Defense Training)
2. ‘पिंक रूम’ सुविधा — सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणासाठी
3. मोफत सायकल वाटप योजना — शिक्षणासाठी प्रवास सुलभ करण्यासाठी
दादाजी भुसे पुढे म्हणाले –
“दत्तात्रय वारे गुरुजींच्या कार्यातून महाराष्ट्राला नवीन दिशा मिळाली आहे. त्यांचे प्रयोग संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी प्रेरणादायी आहेत.”
महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण –
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी मुंबईत न ठेवता प्रत्यक्ष माळरानावर — वारे गुरुजींच्या शाळेत — जाऊन सन्मान केला. हा ऐतिहासिक क्षण YouTube Live द्वारे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला.
या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाल्याबद्दल राज्य आदर्श शिक्षक श्री प्रकाश कानूरकर सर यांनी मा. शिक्षण मंत्री दादाजी भुसे व शिक्षण संचालक महेश पालकर साहेब शिक्षणाधिकारी मा श्रीमती कविता शिंपी व डाएट प्राचार्य मा श्री राजेंद्र कांबळे साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानले.
सरकारी शाळा म्हणजे प्रयोग, तंत्रज्ञान आणि लोकसहभागाचा संगम.
दत्तात्रय वारे गुरुजींच्या अथक परिश्रमांमुळे सरकारी शाळा म्हणजे फक्त शिक्षणाचं नव्हे तर आशा, नाविन्य आणि परिवर्तनाचं प्रतीक बनली आहे.
संपूर्ण महाराष्ट्र त्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना मनःपूर्वक सलाम करत आहे!


