कुडाळ: येथील कुडाळ एमआयडीसी औद्योगिक दृष्टीने झपाट्याने विकसित होत असताना या भागात टपाल खात्याचे पोस्ट ऑफीस असूनही ज्या सुविधा मिळायला हव्या त्या व्यवस्थित मिळत नाही. तसेच पिनकोडचा घोळ असल्याने अनेकदा उद्योजकांची महत्त्वाची कागदपत्र ही नेरूर पोस्टात जातात. त्यामुळे टपाल मिळण्यास उशिर होतो. या प्रश्नाबाबत असोसिएशनने दर महिन्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्योगमित्राच्या सभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. नवनियुक्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांना असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यां समवेत बैठक घेऊन समस्या निराकरण करण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने कुडाळ शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली.
असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर व कार्यवाह अँड. नकुल पार्सॅकर यांनी सिंधुदुर्ग डाक विभागाचे डाक अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांच्यासमोर पोस्ट खात्याच्या सेवेबाबत सविस्तर चर्चा केली. श्री. कुरळपकर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून सर्व उद्योजकांना सुरळीत सेवा देण्याबाबत आश्वासित केलेले असून तशा प्रकारच्या सुचना या भागात कार्यरत असणाऱ्यां सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात येतील असे सांगितले. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. नितीन पावसकर, सहकार्यवाह श्री कुणाल वरसकर, औद्योगिक वसाहतीचे अधिकारी श्री. रेवणकर, पोस्टल कर्मचारी व उद्योजक उपस्थित होते.


