कणकवली : येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात मुंबई विद्यापीठ युवक महोत्सवात विजयी होऊन पदक प्राप्त कलावंत विद्यार्थी, एनसीसी विभागातील राष्ट्रीय पदक प्राप्त विद्यार्थी तसेच जिमखाना विभागातील क्रीडा स्पर्धेतील विजयी विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील उपक्रमशील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ. सौ. राजश्री साळुंखे व विजयकुमार वळंजू उपस्थित होते.
कणकवली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः कल्पकतेने शालेय विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन करून शालेय दप्तरांचे 70 किट बनवले होते.या दप्तरांचे वितरण एन एस एस चे दत्तक गाव वागदे, कलमठ आणि विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थी कलावंतांनी मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत मराठी एकपात्री आणि मिमिक्री’मध्ये सुवर्णपदक, हिंदी एकपात्री, मराठी प्रहसन हिंदी प्रहसन हिंदी एकांकिका, कोलाज रांगोळी, कार्टूनिंग व हिंदी एकांकिका या कलाप्रकारांमध्ये कांस्यपदक प्राप्त विद्यार्थी आणि सर्वोत्कृष्ट स्त्री अभिनय यामध्ये रीना मराळ आणि बुशरा बागवान यांना सन्मानित करण्यात आले.

फोटो – येथील कणकवली महाविद्यालयात जिमखाना विभागाच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. राजश्री साळुंखे, श्री. विजयकुमार वळंजू , प्राचार्य युवराज महालिंगे,इतर मान्यवर व विद्यार्थी.)
महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचा छात्र सैनिक क्षितिज चौकेकर याने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त करून महाविद्यालयाचा लौकिक वाढविला त्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने घेतलेल्या स्पेलिंग रायटिंग स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी मंचावर प्रभारी प्राचार्य युवराज महालिंगे, स्टॉप अँड स्टूडेंट वेल्फेअर विभागाचे प्रमुख डॉ.सोमनाथ कदम, पर्यवेक्षक महादेव माने, एनसीसी विभाग प्रमुख डॉ. बी. एल. राठोड,राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. सुरेश पाटील, ग्रामीण विकास विभाग प्रमुख प्रा. हेमंत गावित अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्षाचे प्रमुख डॉ.एस.टी.दिसले आदीसह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी डॉ.राजश्री साळुंखे श्री विजयकुमार वळंजू व प्र. प्राचार्य युवराज महालिंगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभाचे प्रास्ताविक डॉ. सोमनाथ कदम यांनी केले. सूत्रसंचालन एस. आर. जाधव यांनी केले व शेवटी उपस्थितांचे आभार संदीप तेली यांनी मानले.


