Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

दिल्ली कसोटी जिंकत भारताचा वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश! ; मालिका २ – ० ने घातली खिशात, WTC च्या Points Table मध्ये टीम इंडिया कुठे?

नवी दिल्ली : इंग्लंडमधील शानदार कामगिरीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया पहिल्यांदाच घरच्या मैदानावर वेस्टइंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी उतरली. अहमदाबादमधील पहिली कसोटी जिंकल्यानंतर भारतीय संघाने जबरदस्त आत्मविश्वासाने दिल्लीतील दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवत वेस्टइंडीजला धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने वेस्टइंडीजविरुद्ध 2-0 ने मालिका आपल्या नावावर केली.

दिल्ली कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात तब्बल 518 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात वेस्टइंडीजचा पहिला डाव केवळ 248 धावांवर गडगडला आणि त्यांना फॉलो-ऑन मिळाला. दुसऱ्या डावात वेस्टइंडीजने काहीशी झुंज दिली आणि 390 धावा केल्या, परंतु त्यामुळे भारतासमोर फक्त 120 धावांचे सोपे लक्ष्य उभे राहिले. हे लक्ष्य टीम इंडियाने पाचव्या दिवशी सहज पार करत दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत वर्चस्व गाजवले. पण सलग 2 विजयानंतरही डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया तिसऱ्याच स्थानावर दिसत आहे.

टीम इंडियाचा पहिली डाव : यशस्वी आणि शुभमनचं शानदार शतकी खेळी

भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णपणे बरोबर ठरला. भारतीय फलंदाजांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत पहिल्या डावात धावांचा डोंगर उभारला. दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव 5 गडी बाद 518 धावा करत घोषित केला. डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने 258 चेंडूंमध्ये तडाखेबाज 175 धावा ठोकल्या, ज्यात 22 चौकारांचा समावेश होता. तर कर्णधार शुभमन गिलने देखील अप्रतिम खेळ करत 196 चेंडूंवर नाबाद 129 धावा केल्या, ज्यात 16 चौकार आणि 2 षटकार मारले. वेस्ट इंडिजकडून जोमेल वॉरिकन हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 3 विकेट्स घेतल्या.

वेस्ट इंडिजचा पहिला डाव : कुलदीपच्या फिरकीचा कहर

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना पहिल्या डावात काही खास कामगिरी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर ते पूर्णपणे गारद झाले. एलिक अथानाज (41), शाई होप (36) आणि तेजनारायण चंद्रपॉल (34) यांनी थोडाफार प्रतिकार केला, परंतु बाकीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. ज्यामुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव 248 धावांवर संपला, त्यामुळे भारताला 270 धावांची आघाडी मिळाली आणि भारताने त्यांना फॉलोऑन दिला. भारताकडून कुलदीप यादवने जबरदस्त गोलंदाजी करत 5 विकेट घेतले, तर रवींद्र जडेजाने 3, आणि मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

वेस्ट इंडिजचा दुसरा डाव : कॅम्पबेल आणि होपची शतकी झुंज

फॉलोऑन खेळताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात लढाऊ वृत्ती दाखवली. सलामीवीर जॉन कॅम्पबेलने 199 चेंडूंमध्ये 115 धावा ठोकल्या, तर शाई होपने देखील उत्तम खेळी करत 214 चेंडूंवर 103 धावा केल्या. जस्टिन ग्रीव्ह्स (नाबाद 50), कर्णधार रोस्टन चेज (40) आणि जेडन सील्स (32) यांनीही उपयुक्त खेळी केली. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 390 धावांवर संपला, त्यामुळे त्यांना एकूण 120 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून बुमराह आणि कुलदीप यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले, सिराजने 2, तर जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

भारताचा दुसरा डाव : KL राहुल आणि साई सुदर्शनची भागीदारी, अन् टीम इंडियाचा विजय. 

121 धावांचं लक्ष्य घेऊन भारताची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. सलामीवीर यशस्वी जैस्वाल फक्त 8 धावा करून बाद झाला. पण, त्यानंतर के. एल. राहुल आणि साई सुदर्शन यांनी जबाबदारी स्वीकारत चांगली 79 धावांची भागीदारी केली. के. एल. राहुलने अर्धशतक ठोकले आणि टीम इंडियाचा विजय निश्चित केला. या विजयासह टीम इंडियाने वेस्टइंडीजविरुद्ध 2-0 ने मालिका आपल्या नावावर केली.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles