Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आजगावची जिगरबाज कन्या मानसी पांढरे – युवापिढीला प्रेरणा देणारी दीपस्तंभ! – सामाजिक कार्यकर्ते तथा मदन मुरकर यांचा विशेष लेख.

  • ‘सर्वसामान्य घरातील मुलगी ते पुणे कारागृह पोलीस’ – जिद्दीच्या जोरावर आपल स्वप्न पूर्ण करणारी मानसी पांढरेची आत्मविश्वासात्मक वाटचाल! 
  • आपल्याजवळ आत्मविश्वास असल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही:- मानसी पांढरे
  • सावंतवाडी : तालुक्यातील आजगाव (तांबळवाडी) येथील मानसी दिगंबर पांढरे ही सर्वसाधारण कुटुंबातील असून तिचे पहिले ते सातवी पर्यंतचे शिक्षण जि. प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा आजगांव नं. १, आठवी ते दहावी विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगांव व अकरावी,बारावी बी. एम. गोगटे जुनिअर कॉलेज शिरोडा येथे पूर्ण झाले.

दरम्यान, आपले कॉलेज पूर्ण झाल्यानंतर साहजिकच सर्वांना बारावी नंतर काय करावे?, हाच प्रश्न पडलेला असतो. मानसीला पण हाच प्रश्न पडला. मे महिन्याच्या सुट्टीत ती आपल्या मामाच्या गावी गेली होती. मामाच्या घरी सर्व सोबत बसले असताना , तिने आपण पुढे कोणते शिक्षण घ्यावे ‘ हा विषय सर्वांसमोर मांडला, तर तिच्या मामाच्या तोंडून सहजच उत्तर आले ‘तू पोलीस हॊ’. हाच तिच्या साठी टर्निंग पॉईंट ठरला.त्यानंतर तोच निश्चय पक्का करून पोलीस बनण्यासाठी पुढे काय करावे लागणार ह्या विषयी तिने माहिती घेतली.

काही दिवसानंतर म्हणजेच २०२२ साली तिला सावंतवाडीमधील महेंद्रा ॲकॅडमीची माहिती मिळाली. तिने महेंद्रा ॲकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतमी.त्यांचे मार्गदर्शन लाभल्यानंतर तिने अकॅडेमीत प्रवेश निश्चित केला.सकाळी ६ ते ९ ग्राउंड, १० ते १ लेक्चरस व ३ ते ५ सेल्फ स्टडी असे ॲकॅडमीचे वेळापत्रक होते. आजगांवहून सावंतवाडीपर्यंत जाण्यासाठी सकाळी बस नसल्याकारणाने ती आपल्या मैत्रिणींसोबत रूम घेऊन सावंतवाडीत राहू लागली.

मग इथून तिच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली. पोलीस भरती साठी लागणाऱ्या अटी शर्तीबाबत तिने अभ्यास केला.सुरुवातीला वजन जास्त असल्यामुळे धावण्यासाठी व व्यायामाच्या कसरतीसाठी तिला खुप त्रास सहन करावा लागला. तिने खाण्या-पिण्याकडे जास्त लक्ष दिला व योग्य आहार घेतला पण तिला आवडीचे पदार्थ खाण्याचे सोडावे लागले होते. तसेच तिचे ग्राउंडचे सर खूप मेहनतीने तिच्याकडून प्रॅक्टिस करून घेत.

ग्राउंड सोबतच अभ्यासावर सुद्धा लक्ष देणे तेवढेच गरजेचे होते. चालू घडामोडी, जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित ह्या विषयांचा अभ्यास करणे गरजेचा होता पण हा एवढा सगळा अभ्यास कसा करावा हा प्रश्न तिच्यापुढे पडलेला पण तिच्या ॲकॅडमीमधल्या शिक्षकांनी वेळेचे नियोजन आणि अभ्यास कसा करावा हे योग्यरित्या शिकवले व याबाबत योग्य असे मार्गदर्शन केले.

मानसीने भरतीसोबतच आपले ग्रॅज्युएशनसुद्धा पूर्ण केले.पहिली भरती २०२३ साली सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिली पण त्यात तिला अपयश आले. त्यानंतर २०२४ मध्ये तिने राज्य उत्पादन शुल्क, रेल्वे संरक्षण दल याही भरत्या दिल्या त्यातही तिला अपयश आले मात्र त्यातून तिला अनुभव मिळाला.

२०२४ साली जेव्हा तो सिंधुदुर्ग पोलीससाठी २ मार्क्सने हुकले तेव्हा मात्र ती थोडी खचून गेली. त्यात तिचा आत्मविश्वास ढासळला.सलग २ वर्ष भरती देऊनही यश प्राप्त होत नसल्याने त्यावेळी ठरवले कि भरती सोडून दयावी आणि कुठेतरी कामाला जाऊन घरात मदत करावी. पण डोक्यात तिच्या सतत विचार यायचे कि, खरंच आपण हरलो का? कि आपल्याला पोलीस होणे खुप अवघड आहे? रात्रंदिवस फक्त ते २ मार्क्स तिला सतावत होते. जेवताना झोपताना काहीपण काम करताना फक्त ह्याच गोष्टी डोक्यात यायच्या.परत त्यात करून पाहुण्यांचे टोमणे सतत मनाला लागत.
पण यात तिला आधार मिळाला तो तिच्या आई, वडील व भावाचा .त्यांनी तिला खुप पाठिंबा दिला. त्यांनी तिला सांगितले की ,तू खचून जाऊ नकोस अजून तुला संधी आहे, तू प्रयन्त कर यामुळे तिचा अजून आत्मविश्वास वाढला आणि तिने आपलं मन घट्ट करून आपलं पोलीस होण्याचं स्वप्न साकार होण्यासाठी परत जिद्दीने प्रयत्न सुरू केला. पुढील भरतीसाठी आपण उतरायचे हा विचार केला आणि खाकी वर्दी मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही हा तिने दृढनिश्चय केला.

२०२२-२३ साली पुणे कारागृह शिपाई या पदासाठी २३/०३/२०२४ रोजी फॉर्म भरला. मग तिने ॲकॅडमीला घरून येऊन जाऊन करण्याचे ठरविले कारण ग्राउंड वेळेत सकाळी ७ ते ९:३० असा बदल करण्यात आलेला. तिची आई सकाळी उठून तिला डबा बनवून द्यायची व त्यानंतर तयारी करून ६:०० वाजताच्या बसने जाऊन ग्राउंड, लेक्चरस व अभ्यास करून संद्याकाळी ५:३० च्या बसने घरी यायची आणि २ ते ३ तास दररोज घरी अभ्यास करायची.

२० मार्च २०२५ मध्ये तिने मैदानी परीक्षा पुण्यात दिली. त्यात ती चांगल्या मार्क्सने पास होऊन पुढील लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली. ९ एप्रिल २०२५ रोजी तिची लेखी परीक्षा झाली. आता फक्त वेळ होती ती निकालाची,कमी जागांसाठी जास्त मुले भरतीसाठी असायची त्यामुळे भीती ही मनात होतीच.

शेवटी तो दिवस आलाच ७ मे २०२५ या दिवशी तिचे नाव “पुणे कारागृह पोलीस”च्या फायनल मेरिट लिस्ट मध्ये झळकले. तिच्या मेहनतीला अखेर फळ मिळाले. तो क्षण तिच्या आयुष्यातील सुंदर क्षणापैकी एक होता. यावेळी मात्र तिच्या घरातील , तिचा मित्रपरिवार सर्वजण खुप खुश झाले त्यानंतर तिने पहिला कॉल आपल्या मामाला केला आणि आनंदाश्रुत त्याला सांगितले की ,आपण पोलीस झाले आणि त्यावेळी तिचे मामा पण खुप खुश झाले.

ही बातमी कळताच,त्याच दिवशी अकॅडेमीतील सर्व विद्यार्थी व शिक्षक तिच्या घरी येऊन त्यांनी तिच्यावर गुलाल उधळला .तसेच विविध संस्थानी,गावात, शाळेत, अकॅडेमीत तिचे सत्कार करण्यात आले.

याचे सर्व श्रेय ती आपल्या कुटुंबाला, मित्रपरिवाला व तिला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांना देते.

खरच मानसीचा हा आत्मविश्वासात्मक प्रवास चार शब्दात मांडण्यावढा हा नक्कीच सोपा नाही.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles