सावंतवाडी : तालुक्यातील मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिरातर्फे वाचनालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात माजी राष्ट्रपती भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर वाचन मंदिराचे अध्यक्ष महेश खानोलकर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, ज्येष्ठ आजीव वाचक विलास धोंडू पटेकर, सीताराम (नाना) महादेव नाईक, सुधीर प्रभाकर मालवणकर आदि उपस्थित होते.


मान्यवर उपस्थितांचे स्वागत कार्ड देवून अध्यक्ष महेश खानोलकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त दरवर्षी वाचनालयातर्फे उत्कृष्ट वाचक निवड करून त्यांचा आजच्या दिनी सन्मान करण्यात येतो. त्याप्रमाणे ज्येष्ठ आजीव वाचक विलास पटेकर, सीताराम नाईक, सुधीर मालवणाकर यांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, प्रशस्तीपत्र व ग्रंथभेट देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित्त करण्यात आले.

यावेळी बालगटातून निवड करण्यात आलेल्या कु. वेदिका कृष्णा गावडे, कु.अनुष्का शेखर सावळ, कु. दिव्या राजन राऊळ तसेच साधारण गटांतून निवड करण्यात आलेली कु. धनश्री रवींद्र सोनुर्लेकर यांचाही सन्मान प्रशस्तीपत्र, ग्रंथभेट, गुलाबपुष्प व रोख रक्कम देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. ग्रंथालयाची बाल वाचक कु. जान्हवी अमरे हिने डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जयेश खंदरकर यांनी आपले विचार मांडले. वाचनाने आपली संस्कृती स्थिर आहे. आपल्या जीवनामध्ये वाचन व्यायाम संगत महत्वाची असून त्याद्वारे आपण आपले भविष्य घडवू शकतो हे आपले ध्येय ठेवावे. आजकाल मोबाईल, सोशल मिडिया ही व्यसने झालेली आहेत यावर आरोग्य विभागाकडून स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल असे त्यांनी मत मांडले. आपल्या शेजारच्या गोवा राज्यात दारू अंमली पदार्थांची रेलचेल आहे. त्यापासून आपण दूर राहिले पाहिजे शेजारी बदलू शकत नाही मात्र आपण स्वतःला बदलू शकतो डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम हे महान देशभक्त होते इतर देशांची ऑफर असताना ते परदेशात गेले नाही. त्यानी आपल्या ज्ञानाचा वापर आपल्या भारत देशासाठी केला आणि ते महान झाले, असे श्री. खंदरकर म्हणाले.
ज्येष्ठ सन्मामित वाचक विलास पटेकर, सीताराम नाईक, सुधीर मालवणकर यांनी वाचन का केले पाहिजे?, वाचनामुळे आपण शहाणे बनतो, वाचन आपल्याला समृध्द बनविते. चांगल्या वाचनाने आपण आनंदित राहू शकतो. सत्याचा आढावा घेण्यासाठी वाचन करा, वैज्ञनिक दृष्टीकोन ठेवा, असे विचार मांडले.
मळगावचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक प्रदीप राणे यांनी आजचा दिवस महत्वाचा आहे. वाचनाने मेंदूचा विकास होतो मन प्रवाहीत होते दैनंदिन जीवनात येणा-या असंख्य समस्यांचा समाना करण्यासाठी वाचन हे एक हत्यार आहे. त्याचा आपण पुरेपुर वापर केला पाहिजे, असे सांगितले.

ग्रंथालयाचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, संचालक हेमंत खानोलकर, शांताराम विठ्ठल गवंडे, चंद्रकांत भोजू जाधव, रितेश स. राऊळ, मळगावं हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तसेच ग्रंथालयाचे माजी संचालक बाळकृष्ण शि. मुळीक, वैजनाथ देवण सर मळगाव हायस्कूल शालेय समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, मळगावच्या माजी सरपंच सौ. अर्चना जाधव, वाचनालयाचे संचालक, कर्मचारी वर्ग, हितचिंतक, वाचन प्रेमी, महिला व शालेय विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रंथालयाच्या कार्यवाह सौ. स्नेहा महेश खानोलकर यांनी केले.


