Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

वाचन संस्कृतीचे खरे आधारस्तंभ म्हणजे वृत्तपत्र विक्रेते बांधव! : युवा नेते विक्रांत सावंत. ; सावंतवाडीत वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान, तालुका पत्रकार संघाचा उपक्रम.

​सावंतवाडी : भारतरत्न तथा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी आपण ‘वृत्तपत्र विक्रेता दिन’ साजरा करतो, कारण डॉ. कलाम यांनीही लहानपणी वृत्तपत्रे वाटण्याचे काम केले होते. वृत्तपत्र विक्रेते हे केवळ वृत्तपत्र पोहोचवणारे नव्हे तर ते माहितीचे पहिले वाहक आणि वाचन संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समर्पण भावनेला आणि कठोर परिश्रमाला आजच्या दिनी आपण सलाम करायला हवा. तळागाळातील व्यक्तींना सन्मानित करणारे असे उल्लेखनीय कार्यक्रम राबविणाऱ्या सावंतवाडी पत्रकार संघाचे काम उल्लेखनीय असून, त्यांच्या सर्व उपक्रमांत सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळ परिवार म्हणून नेहमी सोबत राहू, असा विश्वास सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा युवा नेते विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला.

दरम्यान विक्रांत सावंत ते म्हणाले, ​पहाटेची थंडी, पाऊस किंवा कडक ऊन याची पर्वा न करता, सण समारंभ, सुख दुःख याचा विचार न करता वृत्तपत्र विक्रेते वेळेवर आपल्याला जगाशी जोडून ठेवणारी बातमी पोहोचवतात. ते कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायातून चालवतात आणि अनेकजण यातूनच आपल्या मुलांना उच्च शिक्षण देतात. आईचे निधन झाले असतानाही वृत्तपत्र विक्रीचे काम खंडित न होऊ देणारे अनंत माधव यांच्यासारखे विक्रेते तसेच वृत्तपत्र वितरित करीत असतानाच गंभीर आजाराला सामोरे जाऊन देखील आज पुन्हा वृत्तपत्र वितरित करण्याचे काम त्याच हिमतीने करणारे उमेश सावंत यांच्यासारख्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव केला.


सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून बुधवारी वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार वसंत उर्फ अण्णा केसरकर, ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अनंत माधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर, ज्येष्ठ संपादक गजानन नाईक, जिल्हा पत्रकार संघाचे खजिनदार ॲड. संतोष सावंत व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर आदी उपस्थित होते.

यावेळी अण्णा केसरकर म्हणाले, पत्रकारितेत काम करताना अनेक संकटांचा सामना आम्ही केला. यात वृत्तपत्र विक्रेत्यांनी दिलेली सेवा विसरू शकत नाही. आणीबाणी, सत्याग्रहाच्या काळात त्यांनी केलेलं काम उल्लेखनीय आहे. वर्तमानपत्रातून दिलेला विचार जनतेपर्यंत पोहचविण्याच काम या लोकांनी केलं. सावंतवाडी पत्रकार संघानं केलेला उपक्रमाच कौतुक करावं तेवढं आहे. लेखणीची धार वाचकांपर्यंत पोहचवणाऱ्यांचा झालेला सन्मान निश्चितच दखलपात्र आहे, असं मत अध्यक्षीय भाषणात अण्णा केसरकर यांनी सांगितले.

सन्मानाला उत्तर देताना ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अरूण वझे म्हणाले, वृत्तपत्र विकणे साधा विषय नाही. पहाटेपासून आम्ही त्यासाठी मेहनत घेतो. आम्हाला चार पैसे कमी मिळाले तरी मिळणार समाधान शब्दांत वर्णन करता न येणार आहे. पेपर विकण हे कमी पणाच नाही. आमच्या जीवनात पहिल्यांदाच पत्रकार संघान केलेला सत्कार कायम स्मरणात राहील असे भावोद्गार व्यक्त केले. तर १५ व्या वर्षांपासून मी वृत्तपत्र विक्रेता म्हणून काम केलं. आजचा सन्मान माझ्यासाठी संस्मरणीय असा आहे, अशा शब्दांत अनंत माधव यांनी आपल्या भावना मांडल्या.

ज्येष्ठ संपादक गजानन नाईक म्हणाले, सोनीयाचे ते दिवस आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा स्मरणात आले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात सावंतवाडी नेहमिच अग्रस्थानी राहिलंय. भविष्यात या विक्रेत्यांना चांगले दिवस येतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खंदरकर यांनी आपले विचार मांडले.

या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने ७० वर्ष वृत्तपत्र विक्रेता म्हणून सेवा देणारे ८५ वर्षांचे ज्येष्ठ विक्रेते अनंत माधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेते अरूण वझे, प्रकाश केसरकर, बंड्या सावंत, उमेश सावंत, विनायक आरोलकर, रंजन बांदेकर, इब्राहिम शेख, सुभाष बांदेकर, आशा पेडणेकर, नुरजहा खतिब, दीपक गांवकर, राघवेंद्र सावंत, दिनानाथ वाडकर, सचिन गोवेकर यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिवप्रसाद देसाई, सीताराम गावडे, विजय देसाई, शिक्षण प्रसारक मंडळाचे स्कूल कमिटी अध्यक्ष अमोल सावंत, मळगाव येथील कै. उदय खानोलकर वाचन मंदिरचे अध्यक्ष महेश खानोलकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, हर्षवर्धन धारणकर, हेमंत मराठे, रमेश बोंद्रे, सहसचिव विनायक गांवस, ज्येष्ठ सदस्य राजू तावडे, दीपक गावकर, उमेश सावंत, वितरण विभाग प्रमुख सचिन मांजरेकर, अश्फाक शेख, वामन राऊळ, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, सदस्य साबाजी परब, सिद्धेश पुरलकर, आत्माराम धुरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सचिन रेडकर, सूत्रसंचालन विनायक गांवस यांनी केले तर आभार उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी मानले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles