सावंतवाडी : प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे येथे कार्यरत असलेल्या आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी के. लंबे यांनी आपल्याला उपप्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक निरीक्षक श्री. पराग मातोंडकर यांनी माझ्या अखत्यारीत शासकीय रुग्णालय, निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. सावंतवाडी येथे येऊन मी कर्तव्यावर हजर असताना मला धमकी देऊन असभ्य वर्तन केलेबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्गनगरी यांकडे तक्रार दाखल करीत न्याय मिळण्याची विनंती केली आहे.
याबाबत आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी के. लंबे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दिलेली सविस्तर तक्रार अशी की – आपल्या उपप्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक निरीक्षक श्री. पराग मातोंडकर यांनी माझ्या अखत्यारीत शासकीय रुग्णालय, निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्र, ता. सावंतवाडी येथे येऊन मी कर्तव्यावर हजर असताना मला धमकी देऊन असभ्य वर्तन केलेबाबत…
महोदय,
उपरोक्त उपस्थित विषयांन्वये आपले लक्ष वेधण्यात येत आहे की, माझे नांव डॉ. संजिवनी लंबे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे, ता. सावंतवाडी असून सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी या पदावर मी कार्यरत असून आपल्या कार्यालयातील सहाय्यक निरीक्षक श्री. पराग मातोंडकर यांच्या पत्नीदेखील सदर ठिकाणी वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मात्र सदर अधिकारी यांच्या पत्नी या दि. 07.06.2025 पासून प्रसुती रजेवर असल्याकारणाने व सदर कालावधीत संबंधित अधिकारी यांच्या पत्नी वापरत असलेले शासकीय निवासस्थान हे बंद असल्या कारणाने व सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात माझ्यावर संबंधित महिला अधिकारी प्रसुती रजे कारणास्तव गैरहजर असल्याकारणाने सदर ठिकाणी सदर प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिरिक्त जबाबदारी ही माझ्यावर आहे. रात्री अपरात्री रुग्णाला व्यवस्थित सेवा देण्याकरीता सदर ठिकाणी माझी उपस्थिस्ती राहण्याकरीता व त्या संबंधी त्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सांगण्यास्तव व आदेशाने सदर कॉटेज हे तात्पुरते राहण्यासाठी संबंधित अधिकारी यांच्या पत्नी श्रीम. डॉ. पूजा पाताडे यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सदर बाबतीत तात्पुरत्या स्वरुपात आपण हजर होईपर्यंत सदर कॉटेज किंवा एक खोली ही मिळण्यासाठी विनंती केली व मी नेहमीप्रमाणे माझ्या कर्तव्य बजावणीत व्यस्त झाले.
परंतु दि. 13.10.2025 रोजी सायंकाळी 5.20 ते 5.30 या सुमारास आपले अधिनस्त सहाय्यक निरीक्षक परिवहन अधिकारी श्री. पराग मातोंडकर यांनी माझ्या कर्तव्य बजावणीच्या ठिकाणी येवून माझ्याशी बेकायदेशीररित्या हुज्जत घालून मला धमकी तसेच अपमानास्पद वागणूक ही सदर कॉटेज तात्पुरत्या स्वरुपात मागितल्या कारणाने दिली व मी सदर ठिकाणी बजावत असलेल्या शासकीय कामात व्यत्यय आणला. सदर बाबतीत त्यांच्या पत्नीने माझ्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु सदर अधिकारी हा आपल्या पदाचा, हुद्याचा रुतबा हा यापूर्वीही तसेच आजमितीपर्यंत दाखवित आलेला आहे. व आम्ही सहन करीत आलो आहोत. मात्र दि. 13.10.2025 रोजी सदर अधिकारी यांच्याकडून एक महिला म्हणून माझ्याशी घडलेला सदर प्रकार हा निंदनीय स्वरुपाचा असून आपल्या खात्याची प्रतिमा मलीन करणारा आहे.
या कारणास्तव माझी आपणास विनंती आहे की, सदर अधिकारी श्री. पराग मातोंडकर यांच्यावर आपण आपल्या अधिकारीतेत B.N.S. कायदेप्रणाली अंतर्गत कलम B.N.S. कलम 352 असभ्य वर्तन व जाणीवपूर्वक अपमान तसेच B.N.S. कलम 132 शासकीय कर्तव्य बजावणी करीत असताना शासकीय सेवकाच्या कर्तव्यात व्यत्यय आणणे या अनुसार गुन्हा हा तात्काळ दाखल करण्यात यावा. तसेच सदर अधिकारी यांच्या बेकायदेशीर वागण्या संदर्भातील घटनेची नोंद सदर अधिकारी यांच्या सेवा पुस्तकात कायमस्वरुपी शासन निर्णय क्रमांक सा.प्र.वि. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-2016/ प्र.क्र. (204/16) सहा. दि. 23.11.2016 अन्वये घेण्यात यावी. तसेच आपण केलेल्या कारवाई तथा कार्यवाहीचा अहवाल हा शासन निर्णय क्र. 2011 / प्र.क्र. 162/ समन्वय कक्ष, मंत्रालय मुंबई 400032. कार्यालयीन कर्तव्ये पार पाडताना होण्याऱ्या विलंबास प्रतिबंध या शासन निर्णयान्वये 7 दिवसात मला अवगत करावे. अन्यथा सदर बाबतीत आपणास कोणतीही पुर्वकल्पना न देता संबंधित अधिकारी यांस आपण पाठीशी घालून आपल्या विभागाची प्रतिमा मलीन करत असल्याचे गृहीत धरुन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 अन्वये आपले विरुध्द वरिष्ठ प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करण्यात येईल तसेच त्यानंतर उद्भवणाऱ्या सर्व कायदेविषयक बाबींसाठी सदर कार्यालयाचे कार्यालय प्रमुख म्हणून सर्वस्वी आपण जबाबदार असाल हे आपल्या माहितीसाठी सादर करीत असल्याचे डॉ. संजीवनी लंबे, आयुष वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, निरवडे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान सदर तक्रार त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, ओरोस, सिंधुदुर्गनगरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ओरोस, सिंधुदुर्गनगरी., तालुका आरोग्य अधिकारी, सावंतवाडी., उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ओरोस सिंधुदुर्गनगरी यांना देखील सादर केली आहे.


