सावंतवाडी : नेमळे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून ४० हजार रुपयांची औषधे नेमळे आयुष्यमान आरोग्य उपकेंद्राला देऊन पुण्याचे काम केले आहे. हा आदर्श उपक्रम इतरांना प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख, माजी पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी केले.
सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व आयुष्यमान आरोग्य उपकेंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे आभार मानत रुपेश राऊळ म्हणाले की, “लोकांच्या आरोग्याची काळजी घेत एकमेकांशी संवाद आणि समन्वय साधून औषध पुरवठा व्हावा म्हणून सर्वांनी मिळून प्रयत्न केला. आरोग्य उपकेंद्राच्या मागणीला सकारात्मक पाठिंबा देत आज ४० हजार रुपयांची औषधे नेमळे आयुष्यमान आरोग्य उपकेंद्राला नेमळे ग्रामपंचायत देत आहे.”

(फोटो – नेमळे ग्रामपंचायत आरोग्य उपकेंद्राच्या डॉ मोनिका डिसिल्वा यांच्याकडे रूपेश राऊळ यांच्या उपस्थितीत सरपंच दिपीका भैरे औषधे देताना. शेजारी उपसरपंच सखाराम राऊळ व कर्मचारी आदी)
आयुष्यमान आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. मोनिका डिसिल्वा यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “नेमळे आयुष्यमान आरोग्य उपकेंद्रात दर दिवशी १० ते १५ लोक तपासणीसाठी येतात. त्यात गर्भवती महिला, मधुमेह रुग्ण, ब्लड प्रेशर रूग्ण येतात. त्यांना रक्तवाढीसाठी, मधुमेहावर, गुल्कोज अशा विविध औषधांची गरज भासते. औषध पुरवठा व्हावा म्हणून ग्रामपंचायतीत सरपंच, ग्रामसेवक यांना संपर्क साधला असता ती तातडीने उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.”

यावेळी सरपंच दिपीका भैरे यांनी सर्वांचे स्वागत करून पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ४० हजार रुपयांचा औषध पुरवठा करताना समाधान वाटत असल्याचे सांगितले.
यावेळी उपसरपंच सखाराम राऊळ, सदस्य एकनाथ राऊळ, ग्रामसेवक विनोद चव्हाण, स्नेहल राऊळ, शितल राऊळ, डॉ. मोनिका डिसिल्वा, आरोग्य सेवक रोहण भरणे, आरोग्य सेविका एन. आर. कोचरेकर, आशाताई अपर्णा राऊळ, तन्वी पिकुळकर, प्रियांका नेमळेकर, मदतनीस प्रियांका राऊळ, ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


