मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. करूणा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले आहे. धनंजय मुंडेंनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, मी पुरावे घेऊन जरांगे पाटलांकडे गेले होते असं करूणा मुंडे यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा झाली याचीही माहितीही करूणा मुंडे यांनी दिली आहे.
करूणा मुंडे यांनी नेमकं काय म्हटलं?
‘मी जरांगे पाटलांकडे गेले होते. त्यांना मी माझ्याकडे असलेल्या पुराव्यांच्या बाबतही सांगितले होते. पण मला त्यांनी खूप समजावून सांगितले. अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेले नाही बाहेर काढले तर महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल स्वतःच्या समाजाचे लोक चप्पलने मारतील, असं विधान करूणा मुंडे यांनी केलं आहे.
माझ्या बहिणीवर बलात्कार केला – करूणा मुंडे
पुढे बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, माझ्या बहिणीवर बलात्कार केला, माझ्या आईने आत्महत्या केली ती सुसाईड नोट आणि पुरावे माझ्याकडे आहेत. धनंजय मुंडेने गुंडा गॅग पाळलेली होती. माझं धनंजय मुंडे ला चॅलेंज आहे मी अंगावर येते मला शिंगावर घे. तुला जीआर कळतो, तुला शपथ पत्र कळतं का? असा सवालही करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना विचारला आहे. पुढे बोलताना करूणा मुंडे म्हणाल्या की, जरांगे पाटलांनी सर्वांना न्याय दिला, सर्व जातीतील लोकांना न्याय दिला असं विधान केलं आहे.
2021 साली आरोप –
दरम्यान, याआधी करूणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा यांनी 2021 मध्ये, धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. रेणू शर्मा यांनी म्हटलं होतं की, ‘मी धनंजय मुंडे यांना 1996 पासून ओळखते. त्यांनी 2006 पासून वारंवार माझ्यावर बलात्कार केला. 2006 साली माझी बहीण बाळंतपणासाठी इंदौरला गेली होती. तेव्हा घरात कुणी नाही हे माहिती असूनही ते घरी आले आणि माझ्यावर बलात्कार केला.’ याबाबत रेणू शर्मा यांनी पोलिसांत तक्रारही केली होती, मात्र काही दिवसांनंतर ही तक्रार मागे घेण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे. आता आगामी काळात करूणा मुंडे या मनोज जरांगे पाटील यांच्या मदतीने याबाबत आवाज उठवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


