वेंगुर्ला : कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि आसोली ग्रामपंचायत यांच्या वतीने आसोली नंबर एक शाळा आणि आसोली हायस्कूलमध्ये शालेय मुलांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम आसोली गावचे सरपंच श्री बाळा जाधव, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय पवार, ग्रामपंचायत सदस्य शितल घाडी जाधव, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका रायकर मॅडम, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आवळे मॅडम तसेच इतर शिक्षक व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

डॉ. सुदाम मोरे आणि सहकारी तसेच कोकण संस्थेच्या समन्वयक स्वाती मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात 45 विद्यार्थ्यांची तपासणी केली. या शिबिरात विद्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीसह त्यांचे रक्तगट काढले गेले. तसेच, हिंद लॅबच्या टेक्निशियन सौ. भाटकर यांनी तपासणी प्रक्रिया यथाशीघ्र आणि प्रभावीरीत्या पार पाडली.
शिबिराची उद्दीष्टे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करणे आणि त्यांच्या शारीरिक स्थितीची नियमित तपासणी करणे हे होते. ग्रामीण भागात अशा शिबिरांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यांद्वारे मुलांना कोणत्याही आरोग्य समस्येबाबत लवकर निदान होऊ शकते. यामुळे त्यांना योग्य उपचार मिळण्याची शक्यता वाढते.
कार्यक्रमाच्या शेवटी, रायकर मॅडम यांनी कोकण संस्थेच्या आणि ग्रामपंचायत आसोलीच्या कार्याची प्रशंसा केली आणि यापुढेही अशा शिबिरांचे आयोजन सुरू राहावे, अशी शुभेच्छा दिली.


