- जनतेच्या आरोग्य प्रश्नी सावंतवाडीकरांचे एक यशस्वी पाऊल सामाजिक पाऊल..!
सावंतवाडी : पहिल्यांदाच सावंतवाडीत आरोग्य पर्वाचा नवा अध्याय रचला गेला आहे. सावंतवाडीकर जनतेने जनतेच्या मदतीने जनतेसाठी आरोग्याच्या प्रश्नाशी लढण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तोदेखील आंदोलन निषेध यामधून नव्हे तर जनतेच्याच सहयोगातून! सामाजिक कार्यकर्ते ॲड अनिल निरवडेकर यांनी घेतलेल्या पुढाकाराला भाजपा युवा नेते विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी साथ दिली आणि सर्वांसमोर सावंतवाडीकरांनी आरोग्य सेवेचा नवा आदर्श उभा केला. आज सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी पत्र देत डॉक्टर शंतनू तेंडुलकर यांची फिजिशियन म्हणून तात्पुरती नेमणूक केली असल्याचे पत्र दिले आहे.
गेले काही दिवस अस्वस्थ स्वास्थ्याच्या विषयावरून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय धगधगत होते. एकीकडे रुग्णालयात असणारे डॉक्टर आणि कर्मचारी अतिरिक्त जबाबदारीचा ताण घेऊन काम करत होते, तर दुसरीकडे गोरगरीब जनतेला योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांच्या भावना संतप्त होत्या. रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी रुग्णालयात एका फिजिशियन डॉक्टरची गरज होती. त्या गरजेची पूर्तता झाली तर उपलब्ध वैद्यकीय सामग्रीचा वापर होऊन सर्जरी सभा अनेक आजारांवर या ठिकाणी उपचार होऊ शकतात हे लक्षात आले होते. मात्र त्यासाठी सध्या शासनाकडून अशा नेमणुकीसाठी आर्थिक तरतूद होणारी नव्हती. त्यासाठी वैयक्तिक रित्या मानधन देण्याची जबाबदारी कोणीतरी स्वीकारावी लागणार होती.
सावंतवाडीकर जनतेच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन असा एक निधी उभारूया अशी संकल्पना सामाजिक कार्यकर्ते ॲड अनिल निरवडेकर यांनी मांडली. त्याने सावंतवाडीतील विविध संस्था व दानशूर व्यक्ती यांना आवाहन केले. त्यांच्या या पुढाकाराचे तसेच आर्थिक स्व-सहयोगाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कौतुक केले. श्री रविंद्र चव्हाण यांनी तसेच सावंतवाडीतील युवा नेतृत्व विशाल परब यांनी आपला सहयोग अशा निधीसाठी दिला, ज्यामधून सावंतवाडीकर म्हणून इथल्या जनतेला फिजिशियन तसेच मदतीला लागणाऱ्या नर्सेस यांचे एक वर्षभराचे मानधन उभारणे शक्य झाले आहे. आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी सावंतवाडीतील सेवाभावी फिजिशियन डॉक्टर शंतनु तेंडुलकर यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेमणुकीबाबत पत्र दिले. डॉक्टर शंतनू पाटील यांनी ही मानधनापेक्षा सावंतवाडीकर जनतेची आजची गरज म्हणून ही जबाबदारी आपण स्वीकारत असल्याचे सांगितले आहे.
केवळ विरोधाकरता विरोधाची भूमिका न घेता आणि कोणावरही टीका टिपणी करत न बसता स्वतःच्या प्रयत्नातून तोडगा काढण्याच्या सावंतवाडीकरांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड अनिल निरवडेकर, दानशूर युवा नेतृत्व श्री विशाल परब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या सावंतवाडीकर भूमिपुत्रांच्या संकल्पनेतून सुरू झालेली “मी सावंतवाडीकर” ही आरोग्यसेवेची चळवळ खरोखरच जनतेच्या हिताची आहे. लवकरच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि समाजातील दानशूर व्यक्ती एकत्रित येत सावंतवाडीच्या आरोग्य प्रश्नावर गोरगरीब जनतेला मदत होईल असा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एकदिलाने एकत्र येत एक नवा अध्याय घडवणार असे चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहे.


