मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. वरळीच्या महाकाली भागात सिलेंडरचा स्फोट होऊन झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. या आगीत अनेक झोपड्यांचे मोठं नुकसान झाले आहे, मात्र या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दिवाळीच्या तोंडावर ही घटना घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अग्निशमन दल घटनास्थळी असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती समोर आली आहे.
महाकाली झोपडपट्टीत लागली आग –
समोर आलेल्या माहितीनुसार, वरळी सीफेस परिसरातील महाकाली झोपडपट्टीत ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. शाँर्ट सर्कीट मुळे सुरुवातीला आग लागल्याची माहिती मिळाली आहे, त्यानंतर दोन सिंलेडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. सध्या घटनास्थळी पोलील, अग्निशामक दलाचे जवान आणि अधिकारी, बीएमसीचे अधिकारी हजर आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिकाही हजर आहे.
आमदार सुनील शिंदे काय म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी या आगीबाबत माहिती देताना म्हटले की, ‘आदित्य ठाकरे साहेबाचा फोन आलेला होता. आगीच्या ठिकाणी लोकांना मदत करण्यास सांगितलं आहे. ज्या घरात आग लागली, त्या घरातील लोक साईबाबाच्या पालखीला गेले होत. साईबाबांच्या कृपेनं पालखीला गेले होते ते वाचले आहेत. अग्निशामक दलानं आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे.’
अनेक झोपड्या जळून खाक –
महत्त्वाची बाब म्हणजे या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. मात्र या घटनेत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. दिवाळीच्या तोंडावर ही आगीची घटना घडल्याने घर मालकांवर मोठा डोंगर कोसळला आहे. दरम्यान याआधीही मुंबईत आगीच्या अनेक घटना घडल्या होत्या. यातील काही घटनांमध्ये जीवीतहानी तर काही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती.


