सावंतवाडी : ऐन दिवाळी उत्सवात सातोसे गावाल काळोखात रहावे लागल्याने वीज वितरणच्या कारभारावर परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. वसुबारस सणापासून दीपावली सणाला सुरूवात झाली. त्या दिवशीपासून आजपर्यंत सावंतवाडी तालुक्यात वीजेचा खेळखंडोबा, लपंडाव सुरु आहे. तालुक्यात कांही ठिकाणी ‘डीम’ तर कांही ठिकाणी अचानक वीज प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे वीजेची उपकरणे यांच्यावर मोठा परिणाम होत आहे. या वीजेच्या कारभारामुळे ऐन उत्सवात आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यामुळे वीज प्रशासनावर नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वांच्या घरी कंदील, तोरणांनी विद्युतरोषणाई केलेली असताना रात्री वीज गायब झाल्याने ‘दिवाळीची सुरूवात अन् सावंतवाडी तालुक्यातील सातोसे हा गाव रविवारी रात्री दोन ते तीन तास ‘काळोखात’ अशी अवस्था दिवाळीच्या दिवशी झाली. याबाबत सोशल मिडीयावरूनही नागरिकांच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या. वरचेवर सावंतवाडीतील नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यांचे करायचे काय? असा प्रश्न लोकांसमोर उभा आहे.याकडे महावितरणने गाभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
देवगडातही विजेचा लपंडाव –
देवगड शहरातील वीजपुरवठा शुक्रवारी वसुबारस दिवशीच रात्री खंडीत झाला. यासाठी फिडर नादुरूस्त असल्याचे कारण सांगण्यात आले.दीपावलीचा पहिलाच दिवस सर्वत्र विद्युतरोषणाई करण्यात आली होती, मात्र रात्री वीजपुरवठा बंद झाल्याने नागरिक त्रस्त झाले. रात्री १०वा. पर्यंत वीजेचा लपंडाव सुरू होता. देवगड शहराला वीज पुरवठा करणारा फिडर वारंवार नादुरूस्त होण्याचे प्रकार वाढले असून या समस्येवर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. लाईट गेल्यावर सोशल मिडीयावर नागरिकांकडून विविध प्रतिक्रियाही उमटल्या.


