नवी दिल्ली : सुप्रसिद्ध अभिनेता आणि गायक ऋषभ टंडनचं निधन झालं आहे. 22 ऑक्टोबर रोजी दिल्लीत त्यानं अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं ऋषभ टंडनचं निधन झाल्याची माहिती मिळतेय. अभिनेत्याच्या अचानक जाण्यानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

ऋषभ टंडन आपल्या पत्नीसोबत मुंबईत राहत होता. तो आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी दिल्लीला आला होता. पण, कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की, ही दिवाळी त्याची शेवटची दिवाळी ठरेल. अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी अशा दुखःद प्रसंगी प्रायव्हसी ठेवण्याची मागणी माध्यमांकडे केली आहे. अद्याप अभिनेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. सोशल मीडियावर चाहत्यांकडून ऋषभ टंडनला श्रद्धांजली वाहिली जात आहे.
ऋषभ टंडन गायक, अभिनेता, म्युझिक कंपोझर –
ऋषभ टंडन उत्कृष्ट अभिनेता होताच, पण त्यासोबतच तो उत्तम गायक, म्युझिक कंपोझरही होता. तो शांत स्वभाव आणि त्याच्या म्युझिकसाठी ओळखला जायचा. 2008 मध्ये टी-सीरीजचा अल्बम ‘फिर से वही’पासून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली. ऋषभनं ‘फकीर- लिविंग लिमिटलेस’ आणि ‘रशना: द रे ऑफ लाइट’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय. त्यासोबतच ये आशिकी, चांद तू, धू धू कर के, फकीर की जुबानी ही सुपरहिट गाणीही त्यानंच दिलीत.
ऋषभचं प्राण्यांवर फार प्रेम होतं. त्यानं मुंबईतल्या घरात खूप साऱ्या मांजरी, कुत्रे आणि काही पक्षी पाळले होते. मिडिया रिपोर्टनुसार, ऋषभची अनेक गाणी अनरिलीज राहिलीत, गेल्या कित्येक दिवसांपासून तो अनेक गाण्यांवर काम करत होता. सोशल मीडियावर ऋषभचे मित्र आणि जवळचे नातेवाईक त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.
ऋषभचं नाव एकेकाळी अभिनेत्री सारा खानशी जोडलं गेलं होतं. त्या दोघांचा एक फोटो व्हायरल झालेला, त्या फोटोमध्ये सारा खाननं सिंदूर लावलं होतं, ज्यामुळे दोघांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या. दरम्यान, नंतर दोघांनी स्पष्ट केलं की, त्यांनी लग्न केलं नाही. अभिनेत्यानं Olesya Nedobegova नावाच्या रशियन महिलेशी लग्न केलं, जिला तो सेटवर भेटला होता. Olesya नं ऋषभच्या डिजिटल मालिकेत लाईन प्रोड्यूसर म्हणून काम केलेलं. या जोडप्यानं मार्च 2023 मध्ये लग्न केलं. त्यांनी या वर्षी एकत्र करवा चौथ साजरा केला.


