मुंबई : वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पार पडला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 3 गडी गमवून 340 धावा केल्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे षटकं कमी करण्यात आली. डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडसमोर 44 षटकात 325 धावांचं सुधारित आव्हान ठेवण्यात आलं. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने शेवटपर्यंत झुंज दिली. पण धावांचं अंतर खूपच जास्त असल्याने न्यूझीलंडचा पराभव निश्चित होत गेला. न्यूझीलंडचा संघ 8 विकेट गमवून 271 धावा करू शकली. भारताने हा सामना 53 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. पण अजूनही एक चमत्कारीक समीकरण आहे. पण हे समीकरण जुळून येणं कठीण आहे.
भारताने दिलेले आव्हान गाठताना न्यूझीलंडला सुरुवातीलाच धक्का बसला. दुसर्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सुजी बेट्स बाद झाली. अवघी एक धाव करून तिला तंबूत परतावं लागलं. त्यानंतर एमेलिया केर आणि जॉर्जिया डिव्हाईन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. ही जोडी रेणुका सिंगने फोडली. सोफी डिव्हाई मैदानात आली पण काही खास करू शकली नाही. 6 धावांवर असताना रेणुका सिंगने तिचा त्रिफळा उडवला. पण चौथ्या विकेटसाठी टीम इंडियाला खूपच झुंज द्यावी लागली. एमलिया केर आणि ब्रूक हालिडे यांनी 56 धावांची भागीदारी केली. स्नेह राणाने एमेलिया केरची विकेट काढली आणि भारतीय क्रीडाप्रेमींचा जीव भांड्यात पडला.
मॅडी ग्रीनही काही खास करू शकली नाही. 18 धावांवर असताना बाद झाली आणि न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला. विकेट पडल्यानंतर धावांचं अंतर वाढत गेलं. तसेच न्यूझीलंडवरील दबाव वाढत गेला. ब्रूक हालिडेने 84 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकार मारत 81 धावांची खेळी केली. पण तिची विकेट पडली आणि सामना भारताच्या हातात पूर्णपणे गेला. इसाबेलला गेजने त्यातल्या शेवटी फटकेबाजी करत पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. जेस केर 18 धावांवर असताना क्रांती गौडच्या गोलंदाजीवर बाद झाली. स्मृती मंधानाने तिचा अप्रतिम झेल पकडला.
भारताने उपांत्य फेरी गाठली, पण…
भारताची उपांत्य फेरीतील जागा निश्चित झाली आहे. पण अजूनही न्यूझीलंड आणि श्रीलंकेकडे संधी आहे. न्यूझीलंडचा शेवटचा सामना इंग्लंडशी, श्रीलंकेचा शेवटचा सामना पाकिस्तानशी आणि भारताचा शेवटचा सामना बांगलादेशसोबत होणार आहे. भारताने बांगलादेशविरुद्धचा सामना गमावला तर या दोन संघांना चमत्कारिक संधी मिळू शकते. शेवटचा सामना या दोन्ही संघांनी जिंकला तर भारत, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचे प्रत्येकी 6 गुण होतील. पण नेट रनरेटच्या आधारावर चौथा संघ भारतच असू शकतो, असं समीकरण आहे. भारताचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे भारताने सामना गमावला तरी नेट रनरेटच्या आधारावर तिकीट मिळेल. पण भारताने बांगलादेशला शेवटच्या सामन्यात पराभूत केलं तर प्रश्नच उरणार नाही.


