सावंतवाडी : गेल्या काही वर्षांत आम्ही आमचे अनेक जिवलग स्नेही केवळ आरोग्याच्या असुविधा असल्यामुळे गमावले आहेत. हे सांगताना मला अतीव वेदना होत आहेत. मात्र आता हे सहन होत नाही, म्हणून अनेक वर्षांपासून सावंतवाडीकरांचे स्वप्न असलेल्या मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी या हॉस्पिटलचे स्वप्न पुढील दिवाळीपर्यंत नक्कीच पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे अभिवचन भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी गुरुवारी जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे आयोजित ‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सावंतवाडीकरांना दिले.


‘अभंग रिपोस्ट’ कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, विशाल परब, सौ. वेदिका परब, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज नाईक, ॲड. परिमल नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, केतन आडगावकर, ॲड. अनिल निरवडेकर, अमित परब यांसह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान याच कार्यक्रमात सावंतवाडीकरांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याची हमी युवानेते विशाल परब यांनी दिली आहे. गुरुवारी सातत्याने कोसळणाऱ्या पावसातही ‘अभंग रिपोस्ट’च्या टीमने दमदार गाण्यांचे प्रदर्शन करीत उपस्थित सावंतवाडीकरांची मने जिंकली.



