पिंपरी-चिंचवड (पुणे) : पतीच्या सततच्या चारित्र्यावरील संशयाला कंटाळून पत्नीनेच पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना चिंचवड परिसरात घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव नकुल आनंद भोईर (वय ४०) असून, खून करणाऱ्या पत्नीचे नाव चैताली भोईर असे आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे, यामुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत. आज पुन्हा (शुक्रवारी) पहाटे पावणे तीनच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला. वाद चिघळल्याने चैतालीने संतापाच्या भरात ओढणीने नकुलचा गळा आवळून पतीचा जागीच खून केला.
या दाम्पत्याला दोन व पाच वर्षांची दोन लहान मुले असून, घटनेच्या वेळी ती घरातील आतील खोलीत झोपलेली होती. घटनेनंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईरला तात्काळ ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. मृत नकुल भोईर सामाजिक कार्यात सक्रिय होता. तो मराठा क्रांती मोर्चा आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये जिकिरीने सहभागी होत असे. स्थानिक राजकीय नेत्यांशीही त्याचे घनिष्ठ संबंध होते. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत त्याने आपल्या पत्नीला उमेदवार म्हणून उभे करण्याची योजना आखली होती.


