सावंतवाडी : मी बांदा येथे उबाठाचा प्रवेश घेताना शिवसेनेला धक्का दिल्याचे वृत्त सोशल मीडियावर वाचलं. विशाल परब यांनी हा धक्का दिल्याचे समजले. मात्र, हे लोक तासाभरात पुन्हा आमच्या शिवसेनेत आलेत. श्री. परब यांनी उगीच ह्या भानगडीत पडू नये, माझ्या नादाला लागू नये, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला. तर त्यांनी विनाकारण भाजप पक्षाची इज्जत घालवून घेऊ नये, असाही सल्ला संजू परब यांनी दिला.
श्री. परब यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासह महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, भारती मोरे, परिक्षीत मांजरेकर, राकेश पवार, संजय पेडणेकर, क्लेटस फर्नांडिस, समीर पालव आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी श्री. परब पुढे म्हणाले, लाखे बांधवांनी हा पक्षप्रवेश फसवून घेतल्याचे सांगितले. दहशतीला घाबरून आम्ही बोललो नाही असं ते म्हणाले. विशाल परब यांची नाटक मी एका तासात उघड केलीत. माझ्या नादी लागू नये. अन्यथा, मी असा धक्का देईन की त्यांना पुन्हा माणगाव खोऱ्यात जावं लागेल. बाहेरची माणसं अन् असले प्रकार सावंतवाडीत खपवून घेणार नाही. सावंतवाडी शहरात विशाल परब यांनी ढवळाढवळ केल्यास कारनामे बाहेर काढू असा इशारा त्यांनी दिला. तसेच भाजपच्या नेत्यांनी पक्षाची इज्जत घालवून घेऊ नयेत असा सल्ला दिला.


