मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान बघायला मिळतंय. सतत पाऊस सुरू आहे. दिवाळीमध्येही पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. दिवाळी संपली असून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. सध्या राज्यात विविध भागांमध्ये पाऊस सुरू असून रात्रभर मुसळधार पाऊस झाला. सकाळीही ढग कायम असून रिमझिम पाऊस आहे. राज्यात अनेक भागांमध्ये मोठी अतिवृष्टी झाली. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला. बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा रविवारी तीव्र होऊन खोल कमी दाबाचा पट्टा बनला आहे. आता त्याचे रूपांतर मोंथा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर 25 ते 29 ऑक्टोबर 2025 या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग 35 ते 45 किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग 55 किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो.
हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत आज हवामान ढगाळ आहे, तर पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरातील काही भागांत रविवारीही दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आजही संध्याकाळी अशीच परिस्थिती राहणार असल्याची माहिती आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत 14.6 मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात 6.6 मिमी पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैर्ऋत्येकडे सरकले. पुढील 24 तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे.


