नवी दिल्ली : राजधानी दिल्ली ही महिलांसाठी सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा समोर आले आहे. दिल्लीतील लक्ष्मीबाई कॉलेजजवळ एका विद्यार्थिनीवर अॅसिड हल्ला झाला आहे. आज (रविवार) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेनंतर जखमी विद्यार्थिनीला दीपचंद बंधू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही विद्यार्थिनी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी – पीडित विद्यार्थीनी आणि ओरोपीची ओळख होती. आरोपी जितेंद्र हा गेल्या काही काळापासून मुलीला त्रास देता होता. आज पीडित मुलगी अशोक विहारमधील क्लासमधून कॉलेजला जात होती. त्यावेळी आरोपी जितेंद्र हा मित्र ईशान आणि अरमानसह मोटारसायकलवरून आला आणि तिच्यावर अॅसिड हल्ला केला. घटनेनंतर आरोपी पळून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने आणि एफएसएल टीमने घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
आरोपी आणि पीडितेची ओळख –
आरोपी जितेंद्र आणि विद्यार्थिनीची ओळख होती. आज जितेंद्र आणि त्याचे दोन मित्र ईशान आणि अरमान हे तिघे तिच्यावर हल्ला करण्यासाठी मोटारसायकलवरून आले. इशानने अरमानकडे बाटली दिली, त्यानंतर अरमानने विद्यार्थिनीवर अॅसिड फेकले. त्यावेळी पीडितेने हाताने चेहरा वाचवण्याचा प्रयत्न केला, यात तिचे दोन्ही हात जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने आणि एफएसएलच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. पीडित विद्यार्थीनीच्या जबाबावरून आणि जखमांच्या स्वरूपावरून आरोपींवर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून दिल्ली पोलीसांनी अधिक तपास सुरू केला आहे. यावेळी पीडित विद्यार्थिनीने जितेंद्र माझा पाठलाग करत होता आणि सुमारे एक महिन्यापूर्वी आमच्या दोघांमध्ये वाद झाला होता अशी माहिती दिली आहे.
पोलीस आरोपींच्या शोधात –
दिल्लीतील या घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पथकासह आणि एफएसएलच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. दिल्ली पोलीस आता आरोपींच्या शोधात आहेत. यासाठी आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.


