सावंतवाडी : सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध ‘हॉटेल कावेरी’च्या संचालिका व हॉटेल व्यवसायातून उद्योग क्षेत्रात विशेषत: महिला असूनही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. शितल संजय सावंत यांना ‘ग्लोबल बिझनेस लीडर ॲवॉर्ड’ कोल्हापूर येथे नुकताच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने आयोजित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ – गौरवगाथा सन्मान सोहळा, कोल्हापूर – २०२५’ अंतर्गत हा मानाचा पुरस्कार सौ. शितल सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते संजय मोहिते, ‘विसावा’ आश्रम पुणेच्या संस्थापिका सौ. स्वाती तरडे, बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष यशववंत शेळके, गोव्याचे सुप्रसिद्ध रंगकर्मी भालचंद्र उसगावकर, इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रजनी शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
सौ. शितल सावंत यांनी व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय योगदान देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली असून त्या युवक व युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मानाचा हा मानाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.


