मुंबई : महिलेला पाहून शिट्टी वाजवणे, महिलेची ओढणी खेचणे हा विनयभंगाचाच गुन्हा आहे. अशा कृत्यामुळे महिलेच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो, असे निरीक्षण मुंबईतील बोरवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदवले. तर या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने आरोपीला एक हजार रुपयांचा दंडही सुनावला आहे. याप्रकरणात एका तपानंतर निकाल लागला हे विशेष. निवाड्यामुळे टपोरी आणि रोडमजूनांना दणका बसला आहे. टवाळखोरांना यामुळे जरब बसणार आहे.
काय आहे प्रकरण?
एक महिला 2013 पासून पाणीपुरीची हातगाडी कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील भगवती हॉस्पिटलजवळ चालवत होती. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने तिला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी मदत केली होती. 22 एप्रिल 2013 रोजी ही महिला कांदिवली चारकोप परिसरात तिची हातगाडी घेऊन जात होती. दरम्यान एका ठिकाणी तिने हातगाडी उभी केली आणि ती जवळच एका दुकानात गेली. त्यावेळी आरोपी प्रशांत अरविंद गायकवाड हा त्याच्या बहिणीसोबत तिथे आला. त्याने या हातगाडीचे नुकसान केले. ही माहिती मिळताच महिला तिकडे धावली. तक्रारदार महिला जेव्हा तिच्या गाडीकडे गेली तेव्हा आरोपीने महिलेला पाहून शिट्टी वाजवली, तिची ओढणी खेचत गैरवर्तन केले. कांदिवली पश्चिमेकडील चारकोप येथील भगवती हॉस्पिटलसमोरील फूटपाथसमोर ही घटना घडली होती. तब्बल बारा वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.
महिला आणि तरुणात वाद झाला. त्याने तिच्या गाडीचे नुकसान केले. तिचा विनयभंग केला. त्याविरोधात या महिलेने चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षाने आरोपीने विनयभंग केल्याची बाजू प्रभावीपणे मांडली. न्यायालयाने आरोपीने विनयभंग केल्याचे सिद्ध होत असल्याचे निरीक्षण नोंदवले. सुनावणीअंती बोरिवली येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपी प्रशांत गायकवाड याला दोषी ठरवले आणि त्याला सहा महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे रस्त्यांवरील टपोरींना चांगलाच दणका बसला आहे.


