मुंबई : विरोधी पक्षांनी मतदार यादीत दुरूस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व नेते उपस्थित आहेत. या मोर्चात भाषण करताना राज ठाकरे यांनी दुबार मतदारांवर भाष्य केले आहे. राज्यातील प्रमुख मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी – राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. सर्वच पक्ष दुबार मतदार आहेत असं म्हणत आहेत. भाजपचे लोकही मतदार दुबार आहेत असं म्हणत आहे. मी जुलै पर्यंतची यादी वाचून दाखवतो. १ जुलैला त्यांनी यादी बंद केली.
- मुंबई नॉर्थ मतदारसंघात एकूण १७ लाख २९ हजार ४५६ मतदार आहेत, त्यात ६२ हजार ३७० दुबार
- मुंबई नॉर्थ वेस्ट मतदारसंघात एकूण १६ लाख ७४ हजार मतदार, दुबार मतदार ६० हजार
- मुंबई नॉर्थ ईस्ट मतदारसंघात एकूण १५ लाख ९० हजार मतदार, दुबार मतदार ९२ हजार ९८३
- मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघात एकूण १६ लाख मतदार, दुबार मतदार ६३ हजार
- मुंबई साऊथ सेंट्रल मतदारसंघात एकूण १४ लाख ३७ हजार मतदार, दुबार मतदार ५० हजार
- मुंबई साऊथ मतदारसंघात एकूण १५ लाख १५ हजार मतदार, दुबार मतदार ५५ हजार
- नाशिक लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ३४ हजार मतदार, दुबार मतदार ९९ हजार
- मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण १९ लाख ८५ हजार, दुबार मतदार १ लाख ४५ हजार
- पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख १२ हजार मतदार, दुबार मतदार १ लाख २ हजार
हे आकडे सांगितले पुरावा कुठे आहेत हे विचारतील. हे सर्व दुबार मतदार आहेत. (पदडा हटवून दुबार मतदार यादीचा ढीग दाखवला) कल्पना येईल महाराष्ट्रात काय प्रकारचा गोंधळ आहे. एवढा पुरावे दिल्यानंतर सांगतात कोर्टाने सांगितलं निवडणूक घ्या. कुणाला घ्या. कशाला घ्या. कुणाला घाई आहे. पाच वर्ष निवडणूक झाली नाही. अजून एक वर्ष नाही झाल्या तर काय फरक पडतो. त्यातल्या त्यात निवडणुका घेऊन यश मिळवायचं. याला निवडणूक म्हणतात का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला आहे.


