तिरूवअनंतपुरम : रणजी ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा एक खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. खास म्हणजे, काही दिवसांपूर्वीच खराब फॉर्ममुळे या खेळाडूला भारतीय संघातून बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र आता त्याने आपल्या शानदार कामगिरीने निवडकर्त्यांना ठोस उत्तर दिलं आहे. इंग्लंड दौऱ्यात निराशाजनक कामगिरी केल्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आलं आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही त्याची निवड झाली नाही. पण आता रणजी ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या बॅटने दमदार खेळी करत पुन्हा एकदा संघात पुनरागमनाची दारं ठोठावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याने आपल्या खेळाने निवडकर्त्यांसमोर जोरदार दावेदारी सादर केली आहे.
गंभीरने ज्याला संघातून बाहेर फेकलं, त्यानेच घातला धुमाकूळ –
आपल्या जबरदस्त फलंदाजीने गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेणारा खेळाडू म्हणजे करुण नायर. रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत सध्या सुरू असलेल्या सामन्यांमध्ये मंगळुरूमध्ये कर्नाटक आणि केरळ यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात करुण नायरने आपल्या बॅटिंगचा धमाका करत डबल सेंच्युरी ठोकली आहे.
या डावात नायरने केरळच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात आला, तेव्हा कर्नाटकची अवस्था खूपच नाजूक होती, केवळ 13 धावांवर दोन फलंदाज परत पॅव्हेलियनमध्ये गेले होते. पण करुण नायरच्या दमदार खेळीमुळे संघाने शानदार पुनरागमन केलं.
करुणने या डावात 358 चेंडूंचा सामना करत 200 धावांचा टप्पा पार केला, ज्यामध्ये त्याने 21 चौकार आणि 2 षटकार ठोकले. विशेष म्हणजे, मागील सामन्यातही त्याने गोवा विरुद्ध 174 धावांची नाबाद खेळी केली होती. अशा सातत्यपूर्ण फॉर्ममुळे करुण नायर पुन्हा एकदा टीम इंडियात येऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे.
इंग्लंड दौऱ्यावर करुण नायर निराश –
इंग्लंड कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या कसोटी संघात करुण नायरचा समावेश बराच काळ विश्रांतीनंतर करण्यात आला. जवळजवळ आठ वर्षांनी त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, परंतु तो त्या संधींचा फायदा घेऊ शकला नाही. इंग्लंड दौऱ्यात करुणने त्याच्या आठ डावांपैकी फक्त एका डावात अर्धशतक झळकावले, ज्यामुळे निवडकर्त्यांनी त्याला संघातून वगळले. पण आता, करुण पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत आहे आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेत आहे.


