होबार्ट : भारताने होबार्टच्या बेलेरिव्ह ओव्हल मैदानावर इतिहास रचला आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 186 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरा भारतीय संघाने 9 चेंडू शिल्लक ठेवत लक्ष्य गाठले. या विजयासह भारत हा बेलेरिव्ह मैदानावर टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला देश ठरला आहे. वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 49 धावांची विजयी खेळी करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
टिम डेव्हिड अन् मार्कस स्टॉयनिसचा धमाका!
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला सुरुवातीच्या तीन षटकांतच दोन धक्के बसले. अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्याच दोन षटकांत ट्रॅव्हिस हेड आणि जोश इंग्लिस यांना बाद केले. हेड फक्त 6 धावा, तर इंग्लिस केवळ 1 धाव करून माघारी परतला. यानंतर कर्णधार मिचेल मार्श आणि टिम डेव्हिड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 35 चेंडूत 59 धावांची भागीदारी केली. ही जोडी वरुण चक्रवर्तीने मोडली केली. नवव्या षटकात त्याने सलग दोन चेंडूंवर दोन गडी बाद केले. दुसऱ्या चेंडूवर मार्श तिलक वर्माच्या हातून झेलबाद झाला. तो फक्त 11 धावांवर बाद झाला. पुढच्याच चेंडूवर वरुणने मिचेल ओवेनला बोल्ड केले, ओवेन शून्यावर बाद झाला.
दरम्यान, टिम डेव्हिडने दमदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. त्याने मार्कस स्टॉयनिससोबत पाचव्या विकेटसाठी 27 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली. डेविडने 38 चेंडूत 8 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 74 धावा केल्या, त्याला शिवम दुबेनं बाद केलं. यानंतर स्टॉयनिसने मॅथ्यू शॉर्टसोबत सहाव्या विकेटसाठी 39 चेंडूत 64 धावांची भागीदारी केली. स्टॉयनिसलाही अर्शदीपनं माघारी पाठवलं. त्याने 39 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 64 धावा केल्या. शेवटी शॉर्ट 15 चेंडूत 26 धावा आणि जेव्हियर बार्टलेट 3 धावा करून नाबाद राहिले. भारतीय गोलंदाजांमध्ये अर्शदीप सिंग सर्वाधिक प्रभावी ठरला, त्याने 3 विकेट घेतल्या. वरुण चक्रवर्तीने 2 विकेट मिळवल्या, तर शिवम दुबेने 1 विकेट घेतली.
वॉशिंग्टन सुंदरची वादळी खेळी –
धावांचा पाठलाग करताना, अभिषेक शर्मा दमदार फॉर्ममध्ये दिसला, मात्र तो खेळपट्टीवर फार काळ टिकला नाही. अभिषेकने 16 चेंडूत 25 धावा (2 चौकार, 2 षटकार) करताना नॅथन एलिसकडे आपले विकेट गमावले. त्यानंतर एलिसने शुभमन गिललाही (15 धावा) माघारी पाठवले. कर्णधार सूर्यकुमार यादव (24 धावा) लयीत दिसत होता, पण त्यानीही आपले विकेट गमावले. तिसरा विकेट गेल्यानंतर अक्षर पटेल (17 धावा) आणि तिलक वर्मा यांनी मिळून संघाचा स्कोर 100 धावांच्या पुढे नेला. मात्र एलिसने अक्षर पटेलला बाद करून ऑस्ट्रेलियाला महत्त्वाची झळ दिली. यानंतर तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पाचव्या विकेटसाठी 34 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. तिलक वर्मा 29 धावा करून झेवियर बार्टलेटचा बळी ठरला. त्यानंतर, वॉशिंग्टन सुंदर (नाबाद – 49) आणि जितेश शर्मा (नाबाद – 22) यांनी भारताला विजय मिळवून दिला.


