सांगली : पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच ताकाला येऊन भांडं लपवण्यात काय अर्थ म्हणत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुणे पदवीधरसाठी महायुतीचा उमेदवार जाहीर केला. चंद्रकांत पाटलांनी शरद लाड यांचं नाव घोषित केलं. शरद लाड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदवीधरचे आमदार अरुण लाड यांचे पुत्र आहेत. त्यांनी गेल्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना पक्षात घेऊन उमेदवारीचा शब्द दिला होता. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीच शरद लाड यांच्या उमेदवारीची एकप्रकारे घोषणा केली. सांगली जिल्ह्यातील पलूस येथे आयोजित भाजप कार्यालय आणि पक्षप्रवेशाच्या मेळाव्यात ते बोलत होते.
विद्यमान आमदार अरुण लाड हे माजी मंत्री जयंत पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांना धक्का देण्यासाठी भाजपने शरद लाड यांना पक्षात घेतलं. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या नावाची घोषणासुद्धा केली.
राष्ट्रवादीचाही दावा –
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या आधी कागलच्या प्रताप उर्फ भैय्या माने यांच्या नावाची घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्यामुळे या जागेवरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे पदवीधरसाठी रस्सीखेच –
पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अरुण लाड प्रतिनिधीत्व करतात. पुढील वर्षी होणाऱ्या या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं दिसून येतंय. कोणत्याही परिस्थितीत ही जागा निवडून आणायची असा चंग भाजपने बांधल्याचं दिसतंय. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पदवीधर मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी सुरू आहे. तर ही जागा आपल्याकडेच राखण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघात एकीकडे भाजपचे नेटवर्क आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांचेही नेटवर्क मोठं आहे. या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागल्याचं दिसून येतंय.


