सावंतवाडी : वेत्ये – सोनुर्ली येथील रस्त्यावरील खड्डे बुजण्याचे काम कंत्राटदाराने आज हाती घेतले होते. मात्र सदर काम हे केवळ माती टाकून तात्पुरती डागडूजी करण्यात येत होती. यावेळी सदर होत असलेल्या कामाला वेत्ये गावाचे जागृत सरपंच गुणाजी गावडे यांनी आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले. तसेच जोपर्यंत खडी व डांबर यांचे मिश्रण करून खड्डे बुजवले जात नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत काम होऊ देणार नाही, असा आक्रमक पावित्रा सरपंच श्री. गावडे यांनी घेतला.
त्यानंतर बांधकाम विभागाने गावडे यांच्या सूचनेनुसार तात्काळ कंत्राटदाराला सदर घटनेची नोंद घेत योग्य पद्धतीने काम करण्यासाठी प्रवृत्त केले. दरम्यान, सरपंच गुणाजी गावडे आणि सोनुर्ली येथील संदीप गावकर यांच्या या सजगतेमुळे आता या रस्त्याचे काम चांगल्या पद्धतीने होत असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.


