Sunday, November 9, 2025

Buy now

spot_img

मालवणीचा स्वाभिमान चेतवणाऱ्या ‘नानांची’ एक्झिट क्लेशदायक! ; वेंगुर्ल्यातील शोकसभेत अनेकांनी व्यक्त केली भावना!, विविध संस्थांतर्फे गंगाराम गवाणकर यांना आदरांजली!

वेंगुर्ला : ज्या मालवणी भाषेला गावंडळ, गावळी, शिवराळ म्हणून हिणवले जायचे व आपली बोलीभाषा असूनही चारचौघात बोलतानाही मालवणी माणसालाच लज्जा वाटायची. त्याच मालवणी माषेला गंगाराम गवाणकर यांनी अनेकांच्या अंतःकरणात जागा करून दिली. स्वतः मालवणी नसतानाही त्यांनी या भाषेतील नजाकत नेमक्या ढंगात ‘वस्त्रहरण’ या जगप्रसिद्ध नाटकात वापरून त्यांनी इतिहास घडवला. एखाद्या बोलीभाषेतील नाटकाचे पाच हजाराहून अधिक प्रयोग भारतासह सातासमुद्रापारही होतात, हे खूप मोठे भूषण आहे. नाना ह्या नावाने सर्वांना परिचित असलेले गवाणकर आज आपल्यात नाहीत, ही भावना त्रास देणारी आहे. त्यांच्या जाण्याने मालवणी साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना वेंगुर्ल्यात आयोजित केलेल्या शोकसभेतून विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या.

आनंदयात्री वाङमय मंडळ, वेंगुर्ला या संस्थेने कलावलय वेंगुर्ले, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस, किरात ट्रस्ट, फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच वेंगुर्ले, समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग व वेंगुर्ले तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शोकसमेत वक्ते बोलत होते. साईमंगल कार्यालय येथे ही शोकसभा घेण्यात आली.

 

(फोटो – वेंगुर्ले : वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित वेंगुर्लातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नाट्यकर्मी.)

आनंदयात्री वाङमय मंडळाच्या अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर, कलावलयचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगकर्मी संजय पुनाळेकर, आनंदयात्रीचे उपाध्यक्ष अॅड. आनंद बांदेकर, सचिव प्रा. डॉ. सचिन परुळकर, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपेश परब, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य तथा फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचचे सचिव महेंद्र मातोंडकर, खजिनदार तथा ज्येष्ठ पत्रकार प्रदीप सावंत, ज्येष्ठ पत्रकार भरत सातोसकर, साप्ताहिक किरात ट्रस्टचे मेघःश्याम उर्फ सुनील मराठे, कलावलयचे माजी अध्यक्ष रमेश नार्वेकर, आनंदयात्री वाडःमय मंडळाचे राजाराम नाईक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, सामाजिक कार्यकर्ते आदित्य खानोलकर, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष महेश राऊळ, जिल्हा कोषागार अधिकारी तथा व्यंगचित्रकार लेखक संजय घोगळे, आनंदयात्रीच्या पदाधिकारी वृंदा गवंडळकर, ग्रामीण पत्रकार सुनील सातार्डेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी नाटककार, मालवणी माषेला रंगभूमीवर ओळख निर्माण करून देणारे वखहरण नाटकाचे प्रतिमावंत लेखक गंगाराम गवाणकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. मालवणी भाषेत लिहिलेले वस्त्रहरण नाटक सातासमुद्रापार नेणारे व्यक्ती म्हणजे गंगाराम गवाणकर होय. या नाटकाच्या यशस्वीनंतर त्यांनी मालवणी भाषेत लिहिलेली इतर नाटकेही गाजली, कलेची साधना करण्याचा विचार त्यांनी कलाकारांसाठी ठेवला आहे. मालवणी भाषेला रंगभूमीवर आणून तिची प्रतिमा व प्रतिभा जगभर वाढविली. एक अभ्यासू लेखक, दिग्दर्शक व कलाकार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती, असे यावेळी बोलताना वृंदा कांबळी म्हणाल्या.

ज्येष्ठ रंगकर्मी संजय पुनाळेकर यांनी त्यांच्या सानिध्यातील विविध आठवणी कथन केल्या. कुडाळ येथे त्यांच्यासोबत परीक्षण करण्याची संधी मिळाल्याने मी मला भाग्यवान समजतो. वेंगुर्लातील मालवणी एकांकिका स्पर्धेसाठी ते परीक्षक होते. या स्पर्धेत कलावलयच्या खेळखेळिया एकांकिनेने सांधिक प्रथम क्रमांक मिळविला होता. नानांनी याप्रसंगी आम्हा सर्व कलाकारांची भेट घेऊन आम्हाला सातत्याने नवनवीन काहीतरी करण्यासाठी प्रेरणा दिली होती, असे ते म्हणाले. ज्येष्ठ प्रत्रकार प्रदीप सावंत यांनी मालवणी भाषेला स्वाभीमान मिळवून देणारे मच्छींद्र कांबळी व गंगाराम गवाणकर यांचे ऋण मालवणी माणसाला कधीही विसरता येणार नाहीत, असे विचार मांडले.

डॉ. प्रा. सचिन परुळकर, ज्येष्ठ रंगकर्मी रमेश नार्वेकर, महेंद्र मातोंडकर, प्रसन्ना उर्फ बालू देसाई, व्यंगचित्रकार संजय घोगळे, महेश राऊळ, निवृत्त प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles