मुंबई : राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठींच्या मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यासाठी आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
राज्यातील 29 महापालिका, 32 जिल्हा परिषदा, 42 नगर पंचायती, 336 पंचायत समिती, 246 नगरपालिकांची मुदत संपली असून त्यासाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
असेल निवडणुकीचे टाईमटेबल –
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
एकूण किती मतदार?
एकूण मतदार – 1 कोटी 7 लाख 3 हजार 576
महिला मतदार – 53 लाख 22 हजार 870
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार मतदान होणार आहे. त्यामध्ये एकूण 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार असतील. त्यामध्ये 53 लाख 22 हजार 870 महिला मतदार असतील. या निवडणुकांसाठी राज्यात एकूण 13 हजार कन्ट्रोल युनिट स्थापन करण्यात आले आहेत.
गुलाबी मतदान केंद्र –
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन बनवण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. दिव्यांग मतदार, तान्या बाळासह स्त्रिया, ज्येष्ठांना पहिल्यांदा मतदान करु दिले जाईल. तसेच काही मतदार केंद्र गुलाबी केंद्र असणार असून त्यात सर्व अधिकारी या महिला असतील.
विभागनिहाय नगरपरिषद-नगरपंचायती निवडणूक
कोकण – 17
नाशिक – 49
पुणे – 60
संभाजीनगर -52
अमरावती – 45
नागपूर – 55
उमेदवारांच्या खर्चात वाढ –
यंदा नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्च मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यानुसार अ वर्ग नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी 15 लाखांची मर्यादा तर क वर्ग नगरपालिकांसाठी 7 लाखांची खर्च मर्यादा ठरवण्यात आली आहे.
मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. दुबार मतदानासंदर्भात योग्य खबरदारी घेतली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या पुढे डबल स्टारचे चिन्ह दाखवण्यात आले आहे. ज्या मतदारांच्या पुढे डबल स्टार असेल त्याच्याकडून दुसरीकडे मतदान करणार नाही असे डिक्लरेशन घेतलं जाईल.


