मुंबई : विरोधी पक्षाच्या नेत्यावर खोट्या विनयभंगाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करणारे देवेंद्र फडणवीस फलटण प्रकरणात एसआयटी का स्थापन करत नाहीत असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी केला. मयत महिला डॉक्टरविरोधात एकाच महिन्यात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती, त्यांच्यावर कुणाचा दबाव होता असा प्रश्नही मेहबूब शेख यांनी केला. अजित पवारांनी महिला अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा यांना दम दिला होता, तरीही त्या मागे हटल्या नाहीत, त्यांना या तपासाच्या प्रमुख बनवा अशी मागणी मेहबूब शेख यांनी केली. मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
फटलणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचं प्रकरण गाजतंय. त्यामध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या संबंधित लोकांवर, पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. याच प्रकरणात मेहबूब शेख यांनी पुन्हा आरोप केले.
अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा –
मेहबूब शेख म्हणाले की, “आधी ती महिला डॉक्टर चांगली होती, पण तीने डीवायएसपी राहुल धस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर ती कशी काय वाईट झाली? 19 जून रोजी त्या डॉक्टरने राहुल धस यांच्याकडे तिच्यावर दबाव असल्याची तक्रार केली. त्यानंतर एकाच महिन्यात तिच्या विरोधात तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली. एकाच महिन्यात ती डॉक्टर कशी काय वाईट झाली? त्या तीन अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव होता? या प्रकरणाचा सविस्तर तपास व्हावा, त्या तीनही अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे.”


