कणकवली : उद्धव ठाकरे यांनी ”स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती नको”, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले असले, तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही संभाव्य युती सिंधुदुर्ग जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांच्या सर्वसाधारण सूचनांपासून अपवाद ठरवू शकते. या युतीमुळे कणकवलीमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे या राणे बंधूंमध्ये थेट राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि शिंदे गटाचे राजन तेली तसेच सतीश सावंत यांच्यात कणकवली नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. कणकवली नगरपंचायतीत नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाचे संदेश पारकर इच्छुक असून, त्यांना शिंदे गटाचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही गटांकडून ‘कणकवली शहर विकास आघाडी’च्या माध्यमातून एकत्र येण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने मात्र जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे, तर पालकमंत्री नितेश राणे युतीसाठी इच्छुक नसल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाणार आहे.


