ब्रिस्बेन : अखेर ज्याची भीती होती तसंच घडलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी 20I सामना हा पावसामुळे अखेर रद्द करण्यात आला आहे. उभयसंघातील हा सामना ब्रिस्बेनमधील द गाबा येथे आयोजित करण्यात आला होता. या सामन्यावर पावसाचं सावट होतं. या मैदानात पाऊस होणार असल्याची शक्यता 70 टक्के होती. सामन्यात 29 चेंडूंचा खेळ झाला. त्यानंतर हवामान आणि मग पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. या पावसाच्या थांबवण्याची अनेक मिनिटं प्रतिक्षा करण्यात आली. मात्र वरुणराजाने विश्रांती न घेतल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाने मालिकेतील तिसरा आणि चौथा असे सलग 2 सामने जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. त्यामुळे भारताकडे पाचव्या सामन्यात विजयी हॅटट्रिक करण्याची संधी होती. मात्र पावसामुळे भारताची हॅटट्रिक हुकली. भारताने अशाप्रकारे ही मालिका 2-1 ने जिंकली. भारताने अशाप्रकारे एकिदवसीय मालिकेतील पराभवाची परतफेड केली. ऑस्ट्रेलियाने भारताला एकदिवसीय मालिकेत 2-1 फरकाने पराभूत केलं होतं.
पहिला आणि शेवटचा सामना पावसामुळे रद्द –
उभयसंघातील टी 20i मालिकेतील एकूण 2 सामने हे पावसामुळे वाया गेले. मालिकेची सुरुवातही पावसाने आणि शेवटही पावसानेच झाला. पहिला सामना उभयसंघातील पहिला सामना 29 ऑक्टोबरला खेळवण्यात आला होता. या सामन्यात 9.4 ओव्हरनंतर पावसाने एन्ट्री घेतली. त्यानंतर पावसाने खेळ वाया घालवला. तर त्यानंतर आता पाचव्या आणि अंतिम सामन्यात पावसाने चाहत्यांचा हिरमोड केला.


