कणकवली : माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती केल्यास गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला आहे. राणे यांच्या म्हणण्यानुसार, जर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशी युती झाली, तर ते सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिंदेच्या शिवसेनेसोबतचे संबंध तोडतील. नारायण राणे यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी भाजप आणि शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. “तीनपैकी दोन आमदार आमचे आहेत आणि आमची वेगळं लढण्याचीही तयारी आहे”, असे सामंत यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये भाजप एकट्याने लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत दिले आहेत.
कणकवली नगरपंचायतीमध्ये शिंदे गटाने ठाकरे गटाशी युती करण्याच्या चाचपणीवर नारायण राणेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राणे कुटुंबीयात कोणताही अंतर्गत वाद होणार नाही, असेही नारायण राणे यांनी म्हटले आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.


