मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडीया होल्डिंग्स एलएलपी’ या कंपनीने तब्बल 1804 कोटी रुपयांच्या बाजारभावाची जमीन केवळ 300 कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना मोठा दावा केलाय. मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले की, चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. आम्ही जेव्हा काही प्रकरणं पुढे आणतो तेव्हा मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा व्यक्ती असेल तर त्याबाबत कारवाई होत नाही. पण कुठे मुख्यमंत्र्यांना किंवा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. आम्ही सिडको प्रकरण पुढे आणले. त्याप्रकरणात सरकारच्या एका विभागाने सांगूनही संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही. पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणात सुपरफास्ट कारवाई केली जाते. आमचं मत आहे, भेदभाव न करता कारवाई झाली पाहिजे.


